Lok Sabha Election 2024 : भोवळ आल्यानंतरही नितीन गडकरींचे जोरदार भाषण

Lok Sabha Election 2024 : भोवळ आल्यानंतरही नितीन गडकरींचे जोरदार भाषण

यवतमाळ : राज्यात एकीकडे उन्हाचा कडाका वाढलेला असतानाच दुसरीकडे लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरणही तापताना दिसत आहे. मात्र या उन्हामुळे अनेक राजकीय नेत्यांनी प्रचार करताना उन्हाचा तडाखाही बसताना दिसत आहे. आज दुसऱ्या टप्प्यातील प्रचार थंडावणार असल्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह राज्यातील नेत्यांनी जोरदार प्रचारसभांचा धडाका लावलेला पाहायला मिळाला. मात्र यवतमाळच्या पुसद येथील सभेत भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उन्हाच्या त्रासामुळे भोवळ आली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. विशेष म्हणजे भोवळ आल्यानंतरही त्यांनी थोडा वेळ आराम करून पुन्हा जोरदार भाषण केले. (Lok Sabha Election 2024 Nitin Gadkari’s powerful speech despite dizziness)

महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने यवतमाळच्या पुसद येथे जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. याठिकाणी नितीन गडकरीही उपस्थित होते. नितीन गडकरी भाषणासाठी उभे राहिल्यानंतर त्यांना थोड्यावेळाने भोवळ आली. यावेळी त्यांच्या अंगरक्षकांनी खाली पडण्याापसून पकडले आणि मंचावरील इतर नेते आणि पदाधिकाऱ्यांनी नितीन गडकरी यांनी पाणी पाजले. यानंतर नितीन गडकरी यांना खुर्चीवर बसवण्यात आले आणि थोड्यावेळाने सभास्थळी असलेल्या ग्रीन रुममध्ये नेण्यात आले. त्याठिकाणी त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. मात्र नितीन गडकरी यांना भोवळ आल्याने जवळपास 10 मिनिटे त्यांचे भाषण थांबले होते.

हेही वाचा – Lok Sabha : मोदींनी अब्जाधीश बनवले, आम्ही कोट्यवधी लखपती घडवणार; राहुल गांधींकडून घोषणा

नितीन गडकरी यांना भोवळ आल्यामुळे मंचावर एकच तारांबल उडाली होती. मात्र नितीन गडकरी यांनी थोडा वेळा आराम केल्यानंतर त्यांचे भाषण पूर्ण करण्यासाठी पुन्हा मंचावर आले. यावेळी ते म्हणाले की, सिंचन, ऑर्गनिक फार्मिंग, मोदी सरकारने जी धोरणे आखली आहेत, त्याचा लाभ आता दिसत आहे. गाव समृद्ध कसे होईल, हा यामागचा विचार आहे. देशात मोदी सरकार आणायचे असेल तर यवतमाळ-वाशिम लोकसभेतून राजश्री पाटील यांना लोकसभेत पाठवा, असं आवाहन नितीन गडकरी यांनी नागरिकांना केले. यावेळी त्यांनी त्यांना भोवळ येण्याचे कारणही सांगितले. ते म्हणाले की, उन्हामुळे हेलिकॉप्टरमधील एसी बंद होता, हवा नव्हती आणि तापमान जास्त असल्यामुळे मला त्रास झाला. पण थोडा आराम करून मी आता पुन्हा आलो आहे. त्यामुळे झालेल्या त्रासाबद्दल मी क्षमा मागतो, असं म्हणून गडकरी यांनी भाषण संपविले.

नितीन गडकरींना पुन्हा भोवळ (Nitin Gadkari is in trouble again)

दरम्यान, उन्हाची झळ राजकी नेत्यांना बसताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांना भर सभेत भोवळ आली होती. यानंतर आज यवतमाळच्या पुसद येथील सभेत मंत्री नितीन गडकरी यांना भोवळ आली. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे, पण नितीन गडकरी यांना भर सभेत भोवळ येण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीदेखील त्यांना उन्हामुळे भोवळ आल्याची घटना घडली आहे.

हेही वाचा – Sam Pitroda : वारसा करासंदर्भात सॅम पित्रोदांच्या वक्तव्याने वाद; भाजपा-काँग्रेसकडून दावे-प्रतिदाव्यांचं राजकारण

Edited By – Rohit Patil

First Published on: April 24, 2024 5:24 PM
Exit mobile version