Pune Traffic Jam : भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळांच्या रॅलीमुळे पुण्यात वाहतूक कोंडी

Pune Traffic Jam : भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळांच्या रॅलीमुळे पुण्यात वाहतूक कोंडी

मोहोळ यांचे शक्तीप्रदर्शन पुणेकरांचा खोळंबा

पुणे – पुण्यातील लोकसभा निवडणुकीसाठीचे भारतीय जनता पक्ष-महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा उमेदवारी अर्ज गुरुवारी भरण्यात येणार आहे. अर्ज भरण्यापूर्वी मोहोळ यांनी काढलेल्या रॅलीमुळे पुण्यातील कोथरुड, कर्वेनगर, एरंडवणे, डेक्कन-जिमखाना या भागात प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. ऐन उन्हाच्या तडख्यात बराच वेळ रस्त्यावर वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागल्यामुळे पुणेकरांनी वैताग व्यक्त केला.

कोथरुडमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून कर्वे रस्त्याने डेक्कन परिसरातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत मोहोळ यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी रॅली काढली होती. या रॅलीसाठी तयार करण्यात आलेल्या रथामध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, आमदार माधुरी मिसाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर सहभागी झाले होते.

मुरलीधर मोहोळ यांच्या रॅलीमुळे पुण्यात मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी

मोहोळ यांच्या या रॅलीचे ठिकठिकाणी जेसीबीवरील मोठमोठे हार आणि त्यावरून उधळण्यात येणारी फुले याच्या माध्यमातून स्वागत करण्यात येत होते. सकाळी अकराच्या सुमारास या रॅलीला कोथरुडमधून सुरुवात झाली.
भाजपा आणि महायुतीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्यने रॅलीमध्ये उपस्थित होते. पण या रॅलीमुळे पुण्यातील प्रमुख रस्ता असलेल्या कर्वे रस्त्यावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येत होती. त्यामुळे कर्वे रस्त्याला जोडणारे जोड रस्ते आणि त्याच्या आतील समांतर रस्ते या सर्व ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. मेहेंदळे गॅरेजकडून, लॉ कॉलेज रस्त्यावरून नळस्टॉपकडे येणारी वाहतूक अन्य रस्त्याने वळविण्यात आली होती. त्याचबरोबर डेक्कन परिसरातील वाहतूकही पोलिसांनी अन्य मार्गाने वळविली होती. वाहतूक शाखेचे पोलिस वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करीत होते. पण दुचाकीस्वार, चार चाकीचालक यांची मोठी संख्या आणि रॅलीमध्ये सहभागी झालेले कार्यकर्ते आणि त्यांची वाहने यांच्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागण्याची वेळ सर्वसामान्य पुणेकरांवर आली. 11 वाजता कोथरुडमधून निघालेली रॅली सुमारे साडेबाराच्या सुमारास नळस्टॉप चौकात आली होती. विविध चौकांमध्ये रॅलीचे होणारे स्वागत आणि कार्यकर्त्यांची मोठी संख्या यामुळे संथगतीने सुरुवातीला रॅली पुढे सरकत होती. ठिकठिकाणी फुले उधळून आणि फटाके फोडून मोहळ आणि महायुतीतील नेत्यांचे स्वागत होत होते.

हेही वाचा : Loksabha 2024 : शेतकऱ्यांवर गोळीबार करणाऱ्या भाजपला मतदान करणार का? आदित्य ठाकरेंचा मावळच्या जनतेला सवाल

First Published on: April 25, 2024 1:40 PM
Exit mobile version