Lok Sabha 2024 : दुसऱ्या टप्प्यातील प्रचार थंडावणार; राहुल गांधी आणि अमित शहा आज पश्चिम विदर्भात

Lok Sabha 2024 : दुसऱ्या टप्प्यातील प्रचार थंडावणार; राहुल गांधी आणि अमित शहा आज पश्चिम विदर्भात

मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचार बुधवारी (24 एप्रिल) संपत असल्याने येथील आठ मतदारसंघातील प्रचार शिगेला पोहचला आहे. आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि भाजपाचे नेते तथा केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या सभा होत आहेत. याशिवाय राज्यातील नेत्यांनीही प्रचारसभांचा धडाका लावला आहे. दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचार आज संध्याकाळी संपत असल्याने आठही मतदारसंघात प्रचाराचा धुरळा उडणार आहे. (Lok Sabha Election 2024 Rahul Gandhi and Amit Shah in West Vidarbha today)

पश्चिम विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम या पाच, तर मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड आणि परभणी अशा आठ लोकसभा मतदारसंघासाठी येत्या 26 एप्रिल रोजी मतदान होत आहे. मतदानाच्या 48 तास अगोदर निवडणूक प्रचार संपत असल्याने प्रचाराचा आजचा दिवस राजकीय पक्ष, उमेदवार आणि कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाचा आहे. त्यादृष्टीने शेवटच्या तासातील प्रचाराचे नियोजन केले जात आहे.

हेही वाचा – Bacchu Kadu : हनुमानाने…; अमित शहांच्या सभेचा मंडप कोसळल्याने बच्चू कडूंची खोचक टीका

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी भंडारा येथे सभा घेतल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी आज पुन्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांच्या अमरावती आणि सोलापूर येथे सभा होतील. अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारार्थ राहुल यांची पहिली सभा आज दुपारी सव्वा एक वाजता परतवाडा येथील भारत जोडो यात्रा मैदानात होईल. त्यानंतर सोलापूर लोकसभा मतदारसंघातील आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यासाठी मरीआई चौकातील एक्झिबिशन मैदानात राहुल गांधी सभा घेतील. ही सभा दुपारी चारच्या दरम्यान होईल.

तर, भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज अकोला येथे भाजपाचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्यासाठी मंगळवारी अकोला येथे सभा घेतली. अमित शहा हे आज अमरावती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत. दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी अमरावती आणि वर्धा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्या. शरद पवार यांनीही वर्ध्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमर काळे यांच्यासाठी सभा घेतली.

हेही वाचा – Lok Sabha : अजितदादा मुलाच्या पराभवाचा बदला घेणार नसतील, पण…; रोहित पवारांकडून डिवचण्याचा प्रयत्न

अमरावतीत राजकीय वातावरण तापले

दरम्यान, अमरावतीमधील सभेच्या मैदानावरून प्रहार जनशक्तीचे नेते बच्चू कडू आणि पोलीस प्रशासनात मंगळवारी जोरदार वाद झाल्याने येथील राजकीय वातावरण तापले आहे. पोलीस प्रशासनाने बच्चू कडू यांना त्यांचे उमेदवार दिनेश बूब यांच्या प्रचारासाठी सायन्सकोर मैदानात सभा घेण्यास परवानगी दिली होती. मात्र, अमित शहा यांच्यासाठी ही परवानगी रद्द करण्यात आल्याने बच्चू कडू आणि पोलीस अधिकारी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. अमित शहा यांच्या सभेसाठी प्रहार संघटनेला सभा घेण्यासाठी मिळालेली परवानगी रद्द करण्यावरून बच्चू कडू यांनी पोलीस अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. त्यानंतर बच्चू कडू यांनी पोलीस परवानगीचा कागद फाडून पोलीस प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

Edited By – Rohit Patil

First Published on: April 24, 2024 5:00 AM
Exit mobile version