Raigad Election Helpline EPIC : साहेब, मतदार ओळखपत्र कधी मिळेल?

Raigad Election Helpline EPIC : साहेब, मतदार ओळखपत्र कधी मिळेल?
अमुलकुमार जैन : आपलं महानगर वृत्तसेवा

अलिबाग : निवडणुकीत सर्वात महत्त्वाचे असते ते ओळखपत्र. निवडणूक ओळखपत्र हे सर्वात महत्त्वाचे आणि ते नसेल तर ओळख पटवण्यासाठी इतर काही कागदपत्रे उपयोगी असतात. तरीही, ‘साहेब आमचे निवडणूक ओळखपत्र केव्हा मिळेल?’, अशी सर्वाधिक विचारणा हेल्पलाईन कक्षात रायगड मतदारसंघातील मतदार करत आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी रायगड निवडणूक विभागाकडून मतदारांच्या सहाय्यासाठी टोल-फ्री हेल्पलाईन नंबर कार्यान्वित करण्यात आलेला आहे. १६ मार्च रोजी आचारसंहिता लागू झाली आणि २० मार्चपासून १९५० हा टोल-फ्री क्रमांक मतदारांच्या सेवेत रुजू झाला. तेव्हापासून २०९ कॉल आले. सर्वाधिक कॉल ओळखपत्राची विचारणा करणारे होते. हेल्पलाईन कक्ष २४ तास कार्यरत असते.

ओळखपत्रात चुका

काहींना ओळखपत्र मिळाले आहेत, पण त्यात चुका आहेत. फोटो व्यवस्थित नाही, ओळखपत्रांमध्ये वडिलांचे नाव चुकले, पत्ता चुकला अशा तक्रारी निवारण्यासाठी कॉल येतात. तर नवमतदारांकडून नव्या ओळखपत्रासाठी विचारणा होते.

आचारसंहिता भंगाच्या तक्रारी

निवडणूक विभागाकडून सी-व्हीजिल अॅप सुरू करण्यात आले आहे. या माध्यमातून लोक आचारसंहिता भंगाची ऑनलाईन तक्रार दाखल करू शकतात. यासाठी विशेष कक्ष निवडणूक विभागाने सुरु केलेला आहे. २ मेपर्यंत या अॅपवर ५२ जणांच्या तक्रारी दाखल झाल्या. यातील २१ तक्रारींमध्ये काहीच तथ्य आढळून आले नसल्याचे दिसून आले.

वेळ मारून नेण्याचा प्रकार

निवडणूक ओळखपत्रासाठी बीएलओ आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाण्याचा सल्ला हेल्पलाईनवरून दिला जातो. तेथे गेल्यानंतर ‘ओळखपत्र आले असेल तेव्हा तुम्ही घरी नसाल’, असे उत्तर देऊन वेळ मारून नेली जाते. मतदारयादी शुद्धीकरण, नवमतदार नोंदणी करताना मतदारांना छायाचित्र असलेले ओळखपत्र (एपिक) दिले जाते. नाव नोंदणी केल्यानंतर किंवा नावातील दुरुस्तीनंतर एक ते दोन महिन्यांत घरपोच ओळखपत्र पाठवले जाते. प्रत्यक्षात, ओळखपत्र घरपोच मिळत नाही. – विकास नारननार. शास्त्री नगर. अलिबाग.

ओळखपत्रांच्या अधिक तक्रारी

मतदारांच्या समस्या सोडवण्यासाठी व्होट हेल्पलाईन सुरू केली आहे. यात सर्वाधिक तक्रारी ओळखपत्रासंदर्भातील आहेत. तसेच इतर विभागाच्या देखील तक्रारी येत आहेत. मतदारांनी निवडणूक संदर्भातील तक्रारी या नंबरवर कराव्यात.
– संतोष गोतार्णे, नोडल अधिकारी, तक्रार कक्ष, रायगड

First Published on: May 3, 2024 11:20 PM
Exit mobile version