Lok Sabha 2024 : राज ठाकरे महायुतीचा प्रचार करणार? लवकरच जाहीर करणार निर्णय

Lok Sabha 2024 : राज ठाकरे महायुतीचा प्रचार करणार? लवकरच जाहीर करणार निर्णय

मनसे करणार महायुतीचा प्रचार

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचे त्यांच्या गुढीपाडवा मेळाव्यातून सांगण्यात आले. त्यांच्या या निर्णयानंतर ते आता महायुतीच्या उमेदवारांचाही प्रचार करणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर, याबाबत ते स्वतःच लवकरच निर्णय जाहीर करतील, अशी माहिती मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांच्याकडून देण्यात आली आहे. परंतु, भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनीही राज ठाकरे लवकरच महायुतीचा प्रचार सुरू करतील, अशी अपेक्षा बोलून दाखविली आहे. (Lok Sabha Election 2024 Raj Thackeray will campaign for Mahayuti)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर पक्षातील काही कार्यकर्ते नाराज झाले असून त्यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. याबाबत आता मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी मत व्यक्त करत म्हटले की, जे गेले ते महत्त्वाचे नसल्याचे सांगितले. तसेच, ठाकरे यांनी सर्व विचार करूनच पंतप्रधान मोदी यांना पाठिंबा जाहीर केला. प्रचाराला जायचे की नाही याचा निर्णय अद्याप घेतलेला नसला तरी शनिवारी 13 एप्रिल रोजी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय जाहीर करतील, असे ते म्हणाले.

हेही वाचा… Lok Sabha 2024 : महाराष्ट्रात यंदा विक्रमी मतदान होणार? 48 मतदारसंघात सव्वा नऊ कोटी मतदार

तर, आम्ही एका ठाकरेंना लांब केले तर दुसऱ्या ठाकरे यांना जवळ केले, कारण त्यांच्यात वैचारिक फरक आहे. राज यांनी देशहितासाठी पाठिंबा दिला, तर उद्धव यांनी मंत्रिपदासाठी गद्दारी केली. राज ठाकरे सोबत आल्यामुळे आमची ताकद वाढली आहे. ते लवकरच महायुतीचा प्रचार करतील, अशी अपेक्षा आशिष शेलार व्यक्त केली आहे. त्यामुळे याबाबत आता राज ठाकरे यांच्याकडून नेमका काय निर्णय घेण्यात येतो, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग हा मुंबई, कोकण तसेच नाशिकमध्ये आहे. त्यामुळे या ठिकाणी राज ठाकरे यांनी प्रचार केल्यास महायुतीच्या हिताचे ठरणार आहे. या चारही मतदारसंघात अद्याप महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही. ठाकरे यांच्या बिनशर्त पाठिंब्यामुळे मनसेचा उमेदवार नसणार हे निश्चित झाले असले तरी राज ठाकरे हेच मतदारसंघ प्रचारासाठी निवडतील, असे मानले जात आहे.

मंगल प्रभात लोढा यांनी घेतली भेट

प्रचाराचा निर्णय व्हायचा असतानाच भाजप आमदार मंगल प्रभात लोढा यांनी आज गुरुवारी (ता. 11 एप्रिल) राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाल्याचे समजते. महायुतीच्या प्रचाराचाही विषय या चर्चेला आला असून ठाकरे नेमका काय निर्णय घेतात? याकडे लक्ष लागले आहे. तर ही सदीच्छा भेट असल्याचे लोढा यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा… Lok Sabha 2024 : वंचितची पाचवी यादी जाहीर, मुंबईतील तीन जागांचा समावेश

First Published on: April 11, 2024 10:54 PM
Exit mobile version