Lok Sabha 2024 : उडवाउडवीची उत्तरे नको…, पीयूष गोयल यांना सचिन सावंतांनी सुनावले

Lok Sabha 2024 : उडवाउडवीची उत्तरे नको…, पीयूष गोयल यांना सचिन सावंतांनी सुनावले

मुंबई : महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यांमध्ये जात असल्यावरून महाविकास आघाडीने वेळोवेळी आक्रमक भूमिका घेतली आहे. आता जगातील सुप्रसिद्ध इलेक्ट्रिक कारनिर्मिती कंपनी टेस्लाने भारतात येण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल भाजपा नेते आणि मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पीयूष गोयल यांनी केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी सुनावले आहे.

वेदांता-फॉक्सकॉन, टाटा एअरबस हे महाराष्ट्रात येणारे प्रकल्प गुजरातला गेल्यावरून विरोधकांनी सत्ताधारी महायुतीवर जोरदार टीका केली होती. अलीकडेच महानंद डेअरी एनडीडीबीकडे हस्तांतरित होत असल्यावरून या वादाला पुन्हा एकदा हवा मिळाली होती. तर यावर्षीच्या जानेवारीत सुप्रसिद्ध टेस्ला कंपनीने भारतात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. टेस्लाने सुमारे 30 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची योजना तयार केली आहे.

टेस्ला कंपनीच्या भारता गुंतवणूक करण्याच्या निर्णयाचे श्रेय भाजपाचे ज्येष्ठ नेते पीयूष गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. इंडिया टुडे नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये गोयल म्हणतात, पंतप्रधान मोदी यांनी इलेक्ट्रिक मोबिलिटीसाठी जगाचे केंद्र म्हणून भारताची ओळख तयार केली. परिणामी जगभरातील मोठ्या कंपन्यांचे लक्ष भारताकडे केंद्रीत झाले आहे. या कंपन्यांच्या दृष्टीने भारत आता भविष्यातील इलेक्ट्रिक वाहनांसाठी त्यांचे उत्पादन केंद्र बनले आहे.

टेस्ला प्रकल्पासाठी महाराष्ट्र आणि गुजरात ही संभाव्य ठिकाणे मानली जात आहेत का, असे विचारले असता गोयल म्हणाले, “हम भारत के रहने वाले हैं भारत की बात करते हैं।” तर दुसरीकडे, पंतप्रधान मोदी यांनी एका वृ्त्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत, देशाच्या विकासाबद्दलची भूमिका मांडली आहे. गुजरातच्या विकास करूनच देशाचा विकास साध्य होणार होईल, अशी माझी गुजरातचा मुख्यमंत्री असल्यापासूनचीच धारणा आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

यावरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी पीयूष गोयल यांच्यावर निशाणा साधला आहे. उडवाउडवीची उत्तरे न देता, सरळ सांगा टेस्ला प्रकल्प महाराष्ट्रात येणार का गुजरातमध्ये घालवणार? असा थेट सवाल त्यांनी केला आहे. “मोदीजी भारत की नहीं सिर्फ गुजरात की बात करते हैं!” ते म्हणतात, गुजरातचा विकास म्हणजे देशाचा विकास. मग महाराष्ट्राचा विकास म्हणजे कुठल्या दुसऱ्या देशाचा विकास आहे का? असा खोचक प्रश्न विचारून सावंत यांनी सांगितले की, महाराष्ट्रात येऊ घातलेले सगळे प्रकल्प गुजरातला नेते आहात. नरेंद्र मोदी यांच्या इच्छेखातर महाराष्ट्रावर सतत किती अन्याय करणार? निवडणूक महाराष्ट्रात लढवत आहात हे लक्षात ठेवा, असे त्यांनी सुनावले आहे.


Edited by – Manoj S. Joshi

First Published on: April 16, 2024 10:36 AM
Exit mobile version