Lok Sabha Election 2024 : ईव्हीएम बंद होणे हे तर षडयंत्र, संजय राऊतांचा आरोप

Lok Sabha Election 2024 : ईव्हीएम बंद होणे हे तर षडयंत्र, संजय राऊतांचा आरोप

मुंबई : राज्यातील आठ आणि देशभरातील 88 जागांवर दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मतदानासाठी सर्व नागरिक घराच्या बाहेर पडत असून दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी लोकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. परंतु, मतदान सुरू झाल्याच्या काही वेळातच वर्ध्यातील कारंजामध्ये आणि नांदेडच्या माहुरमध्ये ईव्हीएम बंद पडल्याने मतदारांचा खोळंबा झाला आहे. पण ईव्हीएम बंद होणे, हे तर एक षडयंत्र असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. (Lok Sabha Election 2024 Sanjay Raut allegation that closure of EVMs is a conspiracy)

प्रसार माध्यमांनी आज शुक्रवारी (ता. 26 एप्रिल) खासदार संजय राऊत यांना वर्धा, नांदेड येथील ईव्हीएम बंद पडत असल्याची माहिती दिली. ज्यानंतर याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, ईव्हीएम बंद पाडणे हे वारंवार होत राहिल किंवा केले जाईल. वर्धा असेल, अमरावती असेल तिथे हे होईलच. अमरावतीमध्ये तर कोणतेही अघोरी कृत्य होऊ शकते. वर्ध्यामध्ये भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्या ठिकाणी सभा घेतल्याने भाजपा घाबरला आहे. त्यामुळे ईव्हीएम बंद पाडणे आणि मतदारांना खोळंबायला लावणे, त्यानंतर मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवणे हा एक षडयंत्राचा भाग आहे, असा आरोप खासदार राऊत यांनी केला आहे.

हेही वाचा… Lok Sabha 2024 : पंतप्रधान मोदींना तिसऱ्यांदा देशाच्या राज्यगादीवर बसवण्यासाठी विक्रमी मतदान करा – संतोष बांगर

तसेच, पण संध्याकाळनंतर ईव्हीएम चालू होतात आणि मतदान सुरळीत होते. पण जो मतदार सकाळीच मतदान करण्यासाठी येतो, त्याला नाउमेद करणे, निराश करणे आणि त्यांना परत पाठवणे हे या निवडणूक यंत्रणेतील मोदीकृत भाजपाचे षडयंत्र आहे, असा दावा राऊतांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आता पुन्हा राऊतांनी ईव्हीएमबाबत केलेल्या या विधानावर सत्ताधाऱ्यांच्या नेतेमंडळींकडून काय उत्तर देण्यात येते. हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आमची जाहीरनाम्यातून भूमिका स्पष्ट…

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने गुरुवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. पण ठाकरे गटाचा हा जाहीरनामा हा यू-टर्न नामा असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यांच्या या टीकेला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर देत म्हटले की, आमच्या जाहीरनाम्याबाबत लोक ठरवतील. पण भाजपाचा जाहीरनामा हा फेकनामा आहे. आमच्या जाहीरनाम्यामध्ये यू-टर्नसारखे काय आहे, हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे. नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षांमध्ये जे निर्णय घेतले, त्यातून त्यांनी यू-टर्न घेतला आहे. पहिल्यांदाच तीन पक्ष एकत्र आल्यानंतर आम्ही आमची भूमिका वचननाम्याच्या माध्यमातून जाहीर केली, पण त्यांना याबाबतची पोटदुखी आहे, असा टोलाच राऊतांनी लगावला आहे.

हेही वाचा… Lok Sabha Election 2024 Phase 2 : लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात देशातील 13 राज्यातील 88 जागांवर मतदान


Edited By : Poonam Khadtale

First Published on: April 26, 2024 9:33 AM
Exit mobile version