Lok Sabha 2024 : यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा? पवारांचा पंतप्रधानांवर हल्ला

Lok Sabha 2024 : यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा? पवारांचा पंतप्रधानांवर हल्ला

देशाचा मूड हा मोदीविरोधी आहे - शरद पवार

सोलापूर : गेली 10 वर्षे देशाची सत्ता भाजपाच्या हातात आहे. आज मोदींच्या हातात देशाचा कारभार असून त्यांनी गेल्या 10 वर्षांमध्ये अनेक आश्वासने दिली होती. पण त्यांनी 2014 मध्ये दिलेले शब्द पाळलेले नाही, मग आता तरी त्यांच्यावर कसा विश्वास ठेवायचा, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. महाविकास आघाडीकडून शरद पवार गटातर्फे धैर्यशील मोहिते पाटील यांना माढा लोकसभेतून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारार्थ ही माढ्यात आज बुधवारी (ता. 24 एप्रिल) सभा आयोदित करण्यात आली होती. यावेळी शरद पवारांनी पंतप्रधान मोदी यांच्या 10 वर्षांच्या कामकाजावर सडकून टीका केली. (Lok Sabha Election 2024 Sharad Pawar criticizes PM Narendra Modi in Madha constituency campaign meeting)

माढ्यातील प्रचार सभेत माजी मंत्री शरद पवार म्हणाले की, गेली 10 वर्ष भाजपाच्या हातात सत्ता आहे. आज मोदींच्या हातात देशाचा कारभार आहे. 2014 ला लोकसभा निवडणुकीत प्रचार करताना त्यांनी सत्ता आल्यावर 50 दिवसांच्या आत महागाई कमी करू असे आश्वासन दिले होते. सामान्य जनतेला महागाईच्या संकटातून बाहेर काढू, असे त्यावेळी त्यांच्याकडून सांगण्यात आले होते. मात्र, त्यांनी जसे सांगितले तसे केले नाही. आपला देश शेती प्रधान देश आहे. आधी आपल्याकडे वाहनांची संख्या कमी होती, पण ती संख्या आता वाढली आहे. त्यामुळे पेट्रोलची गरज सर्वाधिक भासते. त्यामुळे मोदींनी तेव्हा पेट्रोलच्या बाबतची दिलेले आश्वासन पाळले नाही, असे सांगत शरद पवारांनी गेल्या 10 वर्षांच्या महागाईवरून मोदींना लक्ष्य केले.

हेही वाचा… Lok Sabha 2024 : मोदी हे खोटं बोलणारे नेते, 4 जूननंतर पंतप्रधान राहणार नाहीत; संजय राऊतांची टीका

पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर 50 दिवसांच्या आत पेट्रोलची किंमत 50 टक्क्यांनी कमी करू, असे आश्वासन पंतप्रधान मोदी यांच्याकडून देण्यात आले होते. 2014 ला पेट्रोलची किंमत 71 रुपये होती. त्यामुळे लोकांना वाटले की, पेट्रोलची किंमत 50 टक्क्यांनी कमी म्हणजे ती 50-60 रुपयांपर्यंत होईल. पण आज ती किंमत 106 रुपये झाली आहे. मोदींच्या काळात संपूर्ण अर्थव्यवस्था संकटात गेली असल्याचा टोलाही यावेळी पवारांनी लगावला आहे. घरात स्वयंपाक करायला गॅस लागतो आणि 2014 मध्ये त्यांनी गॅस स्वस्त करायचा शब्द दिला. पण तेव्हा गॅसची किंमत 460 रुपये होती. जी आज 1100 रुपये झाली आहे, मग यांच्यावर कसा विश्वास ठेवायचा? असा प्रश्न यावेळी शरद पवारांकडून उपस्थित करण्यात आला आहे.

शरद पवारांनी ऐकवली मोदींची ऑडिओ…

माढ्याच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक ऑडिओ ऐकवली. या ऑडिओमध्ये पंतप्रधान मोदी हे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर टीका करताना ऐकू येत आहेत. पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे भाषण झाले, पण ते महागाईवर म देखील बोलले नाही, असे मोदींकडून सांगण्यात आले. गॅसचे दर वाढल्याने पोरांना खायला अन्न नाही, ज्यामुळे त्यांच्या आया रडत आहेत, त्यामुळे मतदान करायला जाताना घरातील गॅस सिलिंडरसमोर हात जोडा, असे मोदींनी त्यावेळी नागरिकांना सांगितल्याची ऑडिओ क्लीप शरद पवारांकडून आजच्या सभेत ऐकविण्यात आली.

हेही वाचा… Lok Sabha 2024 : महाराष्ट्रातील पंतप्रधान मोदींच्या सभांना प्रतिसाद नाही – संजय राऊत


Edited By : Poonam Khadtale

First Published on: April 24, 2024 1:22 PM
Exit mobile version