Lok Sabha 2024: भर पावसात ठाकरे बरसले; हिंमत असेल तर मला संपवून दाखवा

Lok Sabha 2024: भर पावसात ठाकरे बरसले; हिंमत असेल तर मला संपवून दाखवा

परभणी: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रत्येक पक्षाकडून ठिकठिकाणी प्रचार सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज परभणीत सभा होती. ही सभा सुरू असतानाच वरुणराजा बरसला. परंतु या कोसळत्या पावसातही उद्धव ठाकरे विरोधकांवर कडाडले. त्यांनी पंतप्रधान मोदींसह भाजपाला धारेवर धरलं. यावेळी ठाकरेंनी आव्हान दिलं की, हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंना संपवून दाखवा. त्यांच्या या सभेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. (Lok Sabha Election 2024 Uddhav Thackeray criticized Narendra Modi and Amit Shah)

मोदी-शहांवर सडकून टीका

परभणी माझ्या शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. तुम्ही सर्व त्याचे सैनिक आहात. भाजपाला असं वाटलं असेल, मिध्यांना असं वाटलं असेल की, सर्व काही पैशांनी विकत घेता येतं. पण परभणीकर पैशांनी विकले जाऊ शकत नाहीत. हे शिवसेना प्रमुखांनी कमवलेलं जे प्रेम आहे ते आशीर्वादाच्या रुपाने माझ्यासमोर बसलं आहे. ही आपली परीक्षा आहे. अरे वादळालासुद्धा अंगावर घ्यायला मर्दाची छाती लागते ती आपल्याकडे आहे. आम्ही पाठीवर वार करत नाहीत. आम्ही वादळाच्याही छातीवर वार करणारे शिवरायांचे मावळे आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

निवडणूक आयोगावरही साधला निशाणा

तुम्हाला कल्पना आहे, एक-दोन दिवसांपूर्वी मी पत्रकार परिषद घेतली होती. कशासाठी घेतली होती? आपलं जे मशाल चिन्ह आहे त्यामध्ये एक शब्द आहे, जय भवानी, जय शिवाजी, आता त्या गाण्यातल्या मोदी-शहांचा जो नोकर निवडणूक आयोग आहे त्याने सांगितलं की, जय भवानी शब्द काढा. काढायचा शब्द? मी तर मोदी आणि शहा यांना सांगतो, तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र हा जय भवानी, जय शिवाजी बोलत उठबशा काढायला सांगितल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.

असंस्कृत माणसांना एकही मत देऊ नका

सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विधानावर मोदी-शहा काही बोलायला तयार नाहीत. सुप्रिया सुळेंवर खालच्या भाषेत टीका केली जाते. अशा असंस्कृत माणसांना एकही मत महाराष्ट्रातून मिळता कामा नये, असं आवाहनही ठाकरेंनी केलं. काही बोलण्यासाठी भाजपाकडे मुद्दे राहिलेले नाहीत. म्हणून ते सातत्याने घराणेशाहीवर बोलतातय. मोदींचं नाणं हे महाराष्ट्रात चालणार नाही. मोदींचा चेहरा महाराष्ट्रात चालत नाही, गद्दारांना विकण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याचं, उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

(हेही वाचा Lok Sabha : घोषणा दिली जय श्रीराम अन् खिशातून…, अरुण गोविल यांच्या रोड शोमधील प्रकार)

Edited By- Prajakta Parab 

First Published on: April 23, 2024 10:52 PM
Exit mobile version