Lok Sabha Election 2024: वडेट्टीवारांचं डोकं फिरलंय; करकरेंवरील वक्तव्यावरून शिंदेंची टीका

Lok Sabha Election 2024: वडेट्टीवारांचं डोकं फिरलंय; करकरेंवरील वक्तव्यावरून शिंदेंची टीका

मुंबई: विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या विधानामुळे सध्या राज्याचे वातावरण तापले आहे. IPS अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही दहशवाद्याच्या बंदुकीतील नव्हती, तर संघ समर्थक पोलीस अधिकाऱ्याने झाडली होती. हे सत्य वकिल उज्वल निकम यांनी लपवून ठेवलं, असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला होता. यावर प्रत्युत्तर देताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आक्रमक झाले. त्यांनी थेट वडेट्टीवारांचं डोकं फिरलंय, म्हणून ते अशी विधान करत आहेत, असा हल्लाबोल शिंदेंनी यावेळी केला. मुंबईत ते पत्रकारांशी संवाद साधत होते, यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.( Lok Sabha Election 2024 Vijay Wadettiwar became Mental Criticism of Cm Eknath Shinde over his statement on Hemnant Karkare)

काय म्हणाले मुख्यमंत्री?

विजय वडेट्टीवार यांनी शहीदांचा अपमान केला आहे. राहुल गांधींच्या नादाने वडेट्टीवारांचं डोकं फिरलं आहे. शिवसेनेत होते तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने चांगले काम करायचे. काँग्रेसमध्ये गेल्यामुळे ते बिघडले आहेत, अशी टीका करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस नेते, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या करकरेंवरील वक्तव्याचा निषेध केला. या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी अशा वक्तव्याचा निषेध करतो, असं शिंदे म्हणाले. पाकिस्तान धार्जिणे काँग्रेससोबत मांडीला मांडी लावून बसताना नकली हिंदू असलेल्यांना लाज वाटत नाही, अशी टीका देखील त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

वडेट्टीवार काय म्हणाले होते?

हेमंत करकरे यांच्या शरीरात घुसलेली गोळी कसबाच्या किंवा कुठल्यागी दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती. ती गोळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या पिस्तुलमधील होती. त्यावेळेस ते पुरावे लपवणारा देशद्रोही कोण असेल तर तो उज्ज्वल निकम आहे. अशा देशद्रोह्याला भाजपा तिकीट देत असेल तर मात्र भाजपा देशद्रोह्यांना पाठीशी घालणारा पक्ष आहे, असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं होतं.

बावनकुळेंनीही घेतला समाचार

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही वडेट्टीवारांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडत पाकिस्तानधार्जिणी भूमिका घेतली. शहीद हेमंत करकरे यांच्यावर चाललेली गोळी पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबची नव्हती, असा जावईशोध वडेट्टीवार यांनी लावला, असं ते म्हणाले.

(हेही वाचा: Lok Sabha 2024 : मुंबईत पुन्हा मराठी-गुजराती वाद? गुजराती रहिवाश्यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना प्रवेश नाकारला)


Edited By- Prajakta Parab

First Published on: May 6, 2024 3:56 PM
Exit mobile version