Lok Sabha 2024: सहानुभूतीची लाट हा माझ्या तोंडात घातलेला शब्द; भुजबळांचा यू- टर्न

Lok Sabha 2024: सहानुभूतीची लाट हा माझ्या तोंडात घातलेला शब्द; भुजबळांचा यू- टर्न

मुंबई: उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांचे पक्ष फुटले आहेत. त्यामुळे त्यांच्या बाजूने लोकांची सहानुभूती आहे, ज्याचा फायदा त्यांना लोकसभा निवडणुकीत मिळण्याची शक्यता आहे, असं वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केलं होतं. आता मात्र त्यांनी यावरून यू-टर्न घेतला आहे. सहानुभूतीची लाट वगैरे मी म्हणालो नाही, असा खुलासा त्यांनी केला आहे. (Lok Sabha Election 2024 Wave of sympathy for Uddhav Thackeray and Sharad Pawar not said by me Chhagan Bhujbal U Turn)

काय म्हणाले छगन भुजबळ?

भुजबळ म्हणाले की, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी लोकांच्या मनात सहानुभूतीची लाट आहे, असं मी म्हणालेलो नाही. या दोन्ही नेत्यांचे पक्ष फुटले आहेत, त्यामुळे त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांमध्ये त्यांच्याप्रती सहानुभूती आहे, असं मी म्हणालो होतो. परंतु, शेवटी देशपातळीवर, देशाच्या बाहेरही पंतप्रधान मोदींचं खमक नेतृत्त्व आहे. त्यामुळे जेव्हा मतदानाची वेळ येते, तेव्हा लोकं सहानुभूती बाजूला ठेऊन, नेतृत्वाला मतदान करतात, असं ते म्हणाले.

नेमकं काय म्हणाले होते भुजबळ? 

2014 आणि 2019 सारखा भाजपाचा मार्ग आता सहज सोपा राहिलेला नाही. त्यांनी दावा केलाय की, ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटाचे नेते शरद पवार या दोघांचे पक्ष फुटले आहेत. त्यामुळे त्यांच्या बाजूने लोकांची सहानुभूती आहे, ज्याचा फायदा त्यांना लोकसभा निवडणुकीत मिळण्याची शक्यता आहे. भुजबळ असंही म्हणाले की, NDA चा मार्गही यंदा फार कठीण आहे.

भुजबळ म्हणाले की, मला वाटतं की यावेळी सहानुभूतीची लाट असू शकते. ज्याप्रकारे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत फूट पडली. तसंच, शरद पवारांच्या राष्ट्रवादीतही दोन चुली झाल्या आहेत. त्याचे पडसाद प्रचार सभांमध्येही दिसून येत आहेत.

पवार कुटुंबीयांच्या मतभेदामुळे दु:खी

छगन भुजबळांना बारामतीतील पवार कुटुंबीयांच्या लढतीसंदर्भात विचारलं गेलं. तेव्हा ते म्हणाले की, माझ्यासाठी हा थोडा भावूक क्षण आहे. जे कुटुंबीय मागची इतकी वर्षे एकत्र लढले ते आता वेगळे झाले आहेत. आता जे सुरू आहे ते काही लोकांना अजिबात आवडलेलं नाही. चूक कोणाची आहे, ती गोष्ट वेगळी परंतु हे जे आता सुरू आहे ते नसतं झालं तर बरं झालं असतं, असंही मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

(हेही वाचा: Lok Sabha 2024: अबकी बार 400 पार अशक्य; भुजबळांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ)


Edited By- Prajakta Parab 

First Published on: April 28, 2024 2:06 PM
Exit mobile version