‘दुसऱ्याच्या घरी मुलगा झाल्यावर हे पेढे वाटतात’ फडणवीसांची जयंत पाटलांवर टीका

‘दुसऱ्याच्या घरी मुलगा झाल्यावर हे पेढे वाटतात’ फडणवीसांची जयंत पाटलांवर टीका

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते, जलसंपदा मंत्री जयंत पाटील

राष्ट्रवादीचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नागपूर जिल्हा परिषदेत भाजपचा पराभव झाल्यानंतर ट्विट करत टीका केली होती. भाजपच्या पराभवाची नागपूरमधून सुरुवात झाल्याचे ते म्हणाले होते. या टीकेला उत्तर देताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “दुसऱ्यांच्या घरी मुलगा झाल्यानंतर हे पेढे वाटतात, अशी त्यांची अवस्था झाली आहे. नागपूरमध्ये आमचा पराभव झाला असला तरी राज्यभरात आमचा परफॉर्मन्स चांगला राहिलेला आहे.” मुंबईतील भाजप मुख्यालयात संघटनात्मक बैठक सुरु आहे, या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांची धामधुम सध्या राज्यात सुरु आहे. ६ जानेवारी रोजी राज्यातील सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या. ७ जानेवारी रोजी त्याचा निकाल लागला. देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांचे होमपिच असलेली नागपूर जिल्हा परिषद भाजपच्या हातातून निसटली. पालघर, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर अशा सहा जिल्ह्यांमध्ये एकूण ३३२ जागांसाठी निवडणूक पार पडली. यापैकी भाजपने सर्वाधिक १०३ तर काँग्रेसने ७०, राष्ट्रवादी ४६ आणि शिवसेनेने ४९ जागा जिंकल्या आहेत.

मनसेला अधिक व्यापक होण्याची गरज

भाजप-मनसे युती होणार का? या प्रश्नावरही देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा भाष्य केले. “भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. आमच्या पक्षात सर्व जमातीचे, भाषेचे लोक एकत्र घेऊन आम्ही मार्गक्रमण करतो. मात्र मनसेची विचारसरणी आणि आमच्या विचारसरणीत अजिबात मेळ बसत नाही. भविष्यात मनसेने अधिक व्यापक कार्यप्रणालीचा स्वीकार केल्यास युतीबाबत विचार होऊ शकतो. मात्र अद्यापतरी मनसे व्यापक नसल्यामुळे आम्ही एकत्र येऊ शकत नाही.”

First Published on: January 9, 2020 7:59 PM
Exit mobile version