केंद्राची मंजुरी नसल्यानेच डाळींचे नुकसान : भुजबळ

केंद्राची मंजुरी नसल्यानेच डाळींचे नुकसान : भुजबळ

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत शिल्लक राहिलेल्या डाळींचे वाटप करण्यास केंद्राची मंजुरी नसल्याने डाळ वितरण करण्यात आले नाही. केंद्र सरकारने आजच वितरणाची परवानगी दिली आहे, त्यानुसार शिल्लक डाळीचे लाभार्थींना लवकरच वाटप करण्यात येणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत शिल्लक राहिलेल्या डाळींचे वाटप केले नसल्याने त्या खराब झाल्याबाबतच्या भुजबळांवर आरोप करण्यात येत होते याबाबत भुजबळांनी खुलासा करतांना सांगितले. केंद्र शासनाने राज्यासाठी 1 लाख13 हजार 42 मे.टन डाळींचे नियतन दिले होते. त्यापैकी 1 लाख 6 हजार 600 मे.टन डाळींचे 8 महिन्यांमध्ये वाटप करण्यात आल्यानंतर राज्य शासनाच्या गोदामांमध्ये व रास्त भाव दुकानांमध्ये एकूण 6,442 मे.टन डाळी शिल्लक आहेत.

याबाबत केंद्र शासनास शिल्लक असलेल्या डाळींची आकडेवारी कळवून वितरणासाठी परवानगी मागितली होती. याबाबत वारंवार पत्रव्यवहार करूनही केंद्राकडून परवानगी देण्यात आली नाही अखेर आज 15 एप्रिल रोजी अन्न मंत्रालयाचे उपसंचालक संजय कौशिक यांनी दिलेल्या पत्रानुसार डाळींचे वाटप करण्याबाबत कळविले आहे. त्यानुसार डाळीचे वाटप सुरू करण्यात येईल. हे करत असताना कोणत्याही परिस्थितीत खराब किंवा मानवी खाण्यास अखाद्य डाळीचे वितरण होणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल असेही ते म्हणाले.

First Published on: April 15, 2021 8:18 PM
Exit mobile version