“निष्ठा आणि बांधिलकी दिसली…”, अमित शाहांकडून गिरीश बापट यांची विचारपूस

“निष्ठा आणि बांधिलकी दिसली…”, अमित शाहांकडून गिरीश बापट यांची विचारपूस

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गिरीश बापट यांची तब्येत बरी नसल्याने ते भाजपच्या कार्यक्रमात सहभागी होत नाहीत. महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गिरीश बापट यांची पुण्यात भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच पक्षाबद्दलची त्यांची निष्ठ आणि बांधिलकीची अमित शाह यांनी प्रशंसा केली.

येत्या 26 फेब्रुवारी 2023 रोजी पुण्यातील चिंचवड आणि कसबा पेठ येथे पोटनिवडणूक होत आहे. अनुक्रमे लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे या दोन जागा रिक्त झाल्या आहेत. चिंचवड येथे लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपाने तिकीट दिले आहे. तर, कसबा पेठेत हेमंत रासने यांना भाजपाने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. मात्र या उमेदवारीवर स्थानिक ब्राह्मण समाज नाराज आहे. याच पार्श्वभूमीवर, गुरुवारी (16 फेब्रुवारी) गिरीश बापट यांनी कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद सांधला. त्यावेळी कसबा पेठ निवडणुकीतील भाजपचे उमेदवार हेमंत रासने देखील उपस्थित होते.

नाकात नळी, बोटाला ऑक्सिमीटर लावलेले गिरीश बापट व्हिलचेअरवर बसून निवडणूक प्रचारासाठी आले होते. त्यावरून विरोधकांनी भाजपावर टीका केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष जगताप म्हणाले, कसबा प्रचारासाठी बोलावून भाजपा खासदार बापट यांच्या जीवाशी खेळत आहे. कसबा पोटनिवडणुकीतील उमेदवार धोक्यात आल्याचे लक्षात येताच भाजपाला खासदार बापट यांची आठवण झाली. भाजपाला पुणेकर कधीच माफ करणार नाहीत, असेही त्यांनी म्हटले आहे.

मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज, रविवारी गिरीश बापट यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. प्रकृती अस्वास्थ्य असतानाही त्यांनी काही दिवसांपूर्वी एका समर्पित कार्यकर्त्याप्रमाणे संघटनेच्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. यावरून त्यांची निष्ठा आणि बांधिलकी दिसते. त्यांचे हे समर्पण सर्व कार्यकर्त्यांना प्रेरणा देत राहील, असे ट्वीट त्यांनी केले आहे.

First Published on: February 19, 2023 3:39 PM
Exit mobile version