Breaking: उद्धव ठाकरेंच्या आमदारकीचा निर्णय आता दिल्ली दरबारी

Breaking: उद्धव ठाकरेंच्या आमदारकीचा निर्णय आता दिल्ली दरबारी

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी राज्यपालांची भेट घेतली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राज्यपाल नियुक्त कोट्यातील आमदारकी मिळावी, यासाठी दोन वेळा पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र राज्यपालांनी त्यावर कोणताही निर्णय घेतला नाही. दरम्यान गुरुवारी राज्यपालांनी २४ एप्रिल रोजी मोकळ्या झालेल्या विधानपरिषदेच्या ९ जागांवर निवडणूक घ्यावी यासाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. याचा अर्थ राज्यपाल नियुक्त कोट्यातील जागेसाठी राज्य मंत्रिमंडळाने पाठविलेला प्रस्ताव राज्यपालांनी स्वीकारलेला नाही. त्यामुळे आता ठाकरेंच्या आमदारकीचे भवितव्य दिल्ली दरबारी गेले आहे.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवर तात्काळ निर्णय घ्यावा यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. तसेच गुरुवारी संध्याकाळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे तसेच शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी राज्यपालांची भेट घेऊन पुन्हा एकदा ठाकरेंच्या आमदारकीबाबतचे निवेदन राज्यपालांना दिले आहे. मात्र राज्यपालांनी निवडणूक आयोगाला पाठविलेल्या पत्रात ठाकरे हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ठाकरेंना राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदारकी मिळणार नाही, असा अंदाज काढण्यात येत आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात राज्यपाल म्हणतात की, राज्यात निर्माण होणारा घटनात्मक पेच टाळण्यासाठी निवडणूक होणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये अनेक शिथीलता तसेच सवलती देऊ केल्या आहेत. याचाच आधार घेत केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्र विधान परिषदेतील रिक्त ९ जागांच्या निवडणुकीबाबत निर्णय घेऊ शकते. लॉकडाऊनच्या निकषांचे आणि नियमांचे पालन करत विधान परिषदेच्या ९ जागा करता निवडणूक घेण्यात येऊ शकते. असे राज्यपालांनी निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसल्यामुळे आणि आणि त्यांना येत्या २७ मे पूर्वी दोन्हीपैकी एका सभागृहाचे सदस्य होणे आवश्यक असल्यानेही निवडणूक घेण्यात यावी, असेही राज्यपालांनी म्हटले आहे. कोरोणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने विधान परिषदेची निवडणूक पुढे ढकलली होती.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदाराकीवरून सध्या महाविकास आघडी आणि राज्यपालांमध्ये संघर्ष पहायला मिळत असताना आता खुद्द विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोना संकटाच्या काळात राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होऊ नये, यासाठी विधानपरिषदेच्या निवडणुका घेण्यासाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारीजी यांनी निवडणूक आयोगाकडे शिफारस करण्याचा जो निर्णय घेतला, त्याचे आम्ही स्वागत करतो. तसेचसंविधानाच्या तत्वांचे पालन करीतच राज्यपालांनी हा निर्णय घेतला आहे. केंद्रीय निवडणूक आयोग या शिफारसीवर केंद्रीय गृहमंत्रालयाशी सल्लामसलत करून तत्काळ विधानपरिषदेच्या 9 जागांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय करेल, हा आम्हाला विश्वास वाटतो असे ते म्हणालेत.

 

First Published on: April 30, 2020 9:06 PM
Exit mobile version