उद्धव ठाकरेंच्या आमदारकीसाठी आघाडीच्या नेत्यांचे राज्यपालांकडे साकडे

उद्धव ठाकरेंच्या आमदारकीसाठी आघाडीच्या नेत्यांचे राज्यपालांकडे साकडे

महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नेमणूक करावी, अशी विनंती करण्यासाठी राज्यातल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मंगळवारी संध्याकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली. सोमवारीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाकरे यांची विधान परिषदेवर नेमणूक करावी, अशी शिफारस करणारा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य रामराव वडकुते आणि राहुल नार्वेकर यांच्या राजीनाम्यामुळे राज्यपाल नियुक्त दोन सदस्यांची पदे रिक्त झाली आहेत. त्यापैकी एका पदावर उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करावी अशी विनंती करण्याची शिफारस राज्यपालांना पाठविण्याचा निर्णय ९ एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री पवार यांनी बोलावलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. तशी शिफारस राज्यपालांकडे पाठविण्यातही आली. मात्र, राज्यपालांनी त्यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे सोमवारी पुन्हा एकदा तशी शिफारस करण्याचा प्रस्ताव पारीत करण्यात आला.

आज उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब आदींनी राज्यपालांची भेट घेऊन या निर्णयाची प्रत दिली. राज्यपालांनी यावर लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्याचे कळते.

देवेंद्र फडणवीसही राज्यपालांच्या भेटीला

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारचे शिष्टमंडळ राज्यापालांना भेटण्याआधी दुपारीच राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यातल्या इलेक्ट्रॉनिक तसेच प्रिंट मीडियाची सरकारकडून होत असलेल्या गळचेपी होत असून त्याकडे लक्ष द्यावे, अशी विनंती आपण राज्यपालांना केल्याचे फडणवीस यांनी सांगितले. मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा त्यांच्यासमवेत उपस्थित होते.

First Published on: April 28, 2020 9:29 PM
Exit mobile version