‘आता द्राक्ष आंबट वाटू लागली’; मुख्यमंत्र्यांचे शरद पवारांवर टीकास्त्र

‘आता द्राक्ष आंबट वाटू लागली’; मुख्यमंत्र्यांचे शरद पवारांवर टीकास्त्र

शनिवारी संध्याकाळी पुण्यात भाजपाची महाजनादेश यात्रा पोहचली होती. यामुळे पुणेकरांना प्रचंड वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागला होता. त्यामुळे आज सकाळी फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यामध्ये सरकारनी केलेल्या कामांची माहिती दिली. यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली.

यावेळी, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना धीर देण्याकरिता शरद पवार हे राज्याच्या दौऱ्यावर जाणार असल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांचे स्वागत केले आहे. ‘जी द्राक्ष मिळत नाही ती आंबट असतात’ अशी अवस्था राष्ट्रवादी काँग्रेसची झाली आहे. उदयनराजे पक्षात असताना त्यांना त्यांच्यातील कोणताही दोष दिसला नाही. मात्र, त्यांनी पक्ष सोडल्यानंतर त्यांच्यातले दोष यांनी दिसायला लागले, असे मुख्यमंत्री म्हणाले.

बारामतीत ३७० कलम लागले आहे का?

बारामतीत दुसऱ्या पक्षाच्या लोकांनी सभाच घ्यायच्या नाही का? बारामतीत ३७० कलम लागले आहे का? तुम्ही आमच्या शहरात या, सभा घ्या. आम्ही सहकार्य करतो, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेने पुण्यात प्रवेश केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे.

बारामतीमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा उधळून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, यासंदर्भात देखील ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, ‘फक्त सात कार्यकर्त्यांनी ही सभा उधळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पोलीस येताच त्यांनी भर सभेतून पळ काढला होता. बारामतीमध्ये लाठीचार्ज झाला नाही.’

तसेच, आता कोणतीच मेगाभरती होणार नाही. शिवस्वराज्य यात्रा उदयनराजे यांनी करावी, अशी राष्ट्रवादीची इच्छा होती. मात्र उदयनराजे भाजपात आले. तसेच, भाजपात मोठ मोठाले नेते भाजपाच येत असल्याने हे चांगलेच लक्षण असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

First Published on: September 15, 2019 1:50 PM
Exit mobile version