महानगर इपॅक्ट : ‘त्या’ ठेकेदारावर स्मार्ट सिटीकडून कारवाई; मोटरही जप्त

महानगर इपॅक्ट : ‘त्या’ ठेकेदारावर स्मार्ट सिटीकडून कारवाई; मोटरही जप्त

स्वप्नील येवले । पंचवटी

गोदावरी नदीपात्रातून विनापरवानगी स्मार्ट सिटीच्या कामासाठी पाणी उपसा करणार्‍या संबंधित ठेकेदाराला अधिकार्‍यांनी समज दिली असून, मोटार जप्त केली आहे. या संदर्भात ‘आपलं महानगर’ने गोदावरीतून स्मार्ट कामांसाठी पाणीचोरी या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची घेत दखल स्मार्ट सिटीच्या अधिकार्‍यांनी कारवाई केली. गोदा पार्कसह गंगा घाटावर स्मार्ट सिटी कंपनीकडून सुशोभिकरणाचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्यात सध्या रामकुंड जवळील साईकिरण धाम मंदिरामागे असलेल्या महापालिकेच्या वाहन पार्किंगच्या मोकळ्या जागेवर स्मार्ट सिटी कंपनीकडून दगडी फरशी बसविण्याचे काम सुरु आहे. हे फरशी बसविण्याचे काम ज्या ठेकेदाराकडून सुरु आहे, त्याने चक्क नदीपात्रात पाणी उपसण्यासाठी मोटर टाकल्याचे निदर्शनास आणून दिले. दुपारनंतर ठेकेदाराने पुन्हा मोटर नदीपात्रात टाकत पाणी उपसा सुरु केला होता.

नदीपात्रातून ठेकेदाराने पाणीउपसा केल्याप्रकरणी स्मार्ट सिटी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता ते सुटीवर होते. तर कानडे नामक अधिकारी यांची भेट घेऊन त्यांना सदरचा प्रकार लक्षात आणून दिल्यावर त्यांनी अजब उत्तर दिले. ज्या ठेकेदाराला काम दिले आहे, जर त्याला कामासाठी लागणारे पाणी हे नदीच्या माध्यमातून जवळ उपलब्ध असेल तर घ्यायला काही हरकत नाही. परंतु संबंधित ठेकेदाराने जलसंपदा विभाग, महापालिका तसेच स्मार्ट सिटी कंपनी यांच्याकडून कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे त्यांनी सांगितले.

पाणी उपसासाठी मोटार थेट नदीपात्रात टाकल्याने विद्युत प्रवाह पाण्यात उतरला आणि जर एखादी दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी स्मार्ट सिटी कंपनी घेणार की ठेकेदार घेईल, असा प्रश्न विचारला. त्यानंतर कानडे यांनी सावध पवित्रा घेत त्यांनी स्मार्ट सिटी कंपनीतील त्यांचे सहकारी हिरे नामक अधिकारी यांना ठेकेदारावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. हिरे यांनी तात्काळ कामाच्या ठिकाणी जात ती मोटर जप्त करत ठेकेदाराला समज दिली. यावर महापालिकेच्या गोदावरी संवर्धन विभागाचे उपायुक्त विजयकुमार मुंडे यांच्याशी मोबाईवर संपर्क साधला असता घटनेची माहिती घेऊन कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.महापालिकेकडून कारवाई करण्यात दुजाभाव होत असून स्मार्ट सिटी कंपनीच्या कामांमध्ये पालिकेला विश्वासात घेतले जात नाही, तर स्मार्ट सिटीचे ठेकेदार देखील पालिकेच्या अधिकार्‍यांना जुमानत नसल्याचे काही महापालिका अधिकार्‍यांनी नाव न छापण्याच्या अटींवर सांगितले. महापालिकेच्या नळांना नागरिकांनी पाणी भरण्यासाठी मोटर लावली तर पाणीपुरवठा विभागाकडून ती मोटर जमा करत दंड आकारला जातो. परंतु, महापालिकेकडून स्मार्ट सिटी कंपनीला मनमानी करण्यास परवानगी दिली आहे का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

First Published on: November 2, 2022 12:44 PM
Exit mobile version