Pooja Chavan : शक्तीप्रदर्शन पडलं महागात; महंत कबिरदास महाराज यांच्यासह १९ जण बाधित

Pooja Chavan : शक्तीप्रदर्शन पडलं महागात; महंत कबिरदास महाराज यांच्यासह १९ जण बाधित

शक्तीप्रदर्शन पडलं महागात; १९ जणांना कोरोना

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वादात अडकलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड तब्बल १५ दिवसानंतर घराबाहेर पडले. त्यानंतर त्यांनी पोहरादेवी मंदिरात हजेरी लावली होती. यावेळी बंजारा समाजाच्या समर्थकांनी तोबा गर्दी केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या सूचना पायदळी तुडवत लोकांनी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केले. मात्र, आता हे शक्तीप्रदर्शन चांगलेच महागात पडले आहे. पोहरादेवी गडावरील महंत कबिरदास महाराज यांच्यासह १९ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.

चौफेर बाजूने टीका

पूजा आत्महत्येप्रकरणी वादाच्या बोवऱ्यात अडकलेले संजय राठोड मंगळवारी वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी गडावर गेले होते. या दरम्यान, पोहरादेवी गडावर राठोड यांच्या हजारो समर्थकांनी गर्दी केली होती. एकीकडे कोरोना डोकेवर काढत आहे. त्यामुळे नियमांचे पालन करा, असे सांगण्यात आले असताना देखील मोठ्या प्रमाणात नागरिकांनी तोबा गर्दी केली. त्यामुळे राठोड यांच्यावर चौफेर बाजूने टीका केली जात आहे. तसेच या गर्दीमुळे कोरोनाच्या आकडेवारीत वाढ होणार अशी शक्यता देखील वर्तवण्यात आली होती. मात्र, आता ही शक्यता खरी ठरली आहे.

कबिरदास महाराजांची टेस्ट पॉझिटिव्ह

कबिरदास महाराजांची २१ फेब्रुवारी रोजी कोरोनाची चाचणी केली होती. मात्र, पोहरादेवीवर संजय राठोड यांचा दौरा असताना ते हजर राहिले होते. तसेच ते दिवसभर राठोड यांच्यासोबत होते.

या प्रकरणाची गंभीर दखल घ्या

पोहरादेवी येथे झालेल्या गर्दीबाबत महाविकास आघाडीमधून देखील टीका करण्यात येत आहे. ‘कोरोनाचे नियम पायदळी तुडवणाऱ्यांवर कडक कारवाई करा, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे. ‘पोहरादेवी गर्दीप्रकरणी आपला माणूस असेल तरी कारवाई होणार’, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिली. त्यानंतर आता शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘जो चुकलाय त्याला मुख्यमंत्री क्षमा करणार नाहीत’, असे ते म्हणाले आहेत.


हेही वाचा – Pooja Chavan: ‘मंत्रीच बलात्कारी झालेत, राज्यात आया बहीणी सुरक्षित नाहीत’


 

First Published on: February 25, 2021 1:36 PM
Exit mobile version