हिवाळी अधिवेशन: मराठा आरक्षणासह अनेक मुद्द्यांवर विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन

हिवाळी अधिवेशन: मराठा आरक्षणासह अनेक मुद्द्यांवर विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून विधीमंडळाचे दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्ष भाजपने केले आहे. मराठा आरक्षण, वाढीव वीज बिल, पुरग्रस्तांना आणि वादळग्रस्तांना मदत न देणे आदी विषयांवर भाजपचे नेते आक्रमक झाले आहेत. महाविकास आघाडी सरकारा धिक्कार असो अशा घोषणा विरोधई पक्षांनी दिल्या. भाजपचे प्रदेशाध्याक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आशिष शेलार, अतुल भातखळकर आदी नेत्यांनी आंदोलन केले.

नागपूरला होणारे विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोरोनामुळे मुंबईत घेण्यात येत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी विविध मुद्द्यांवरुन राज्य सरकारविरोधात विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. मराठा आरक्षण, पुरग्रस्तांना मदत, ओबीसी आरक्षण, वीज बिल माफ यांसारख्या विषयांवर भाजपने आंदोलन केले. पुरग्रस्त आणि वादळग्रस्त शेतकऱ्यांना मदत न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो तसेच मराठा आरक्षणाला गांभिर्याने न घेणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा विरोधकांनी दिल्या.

जनतेचे प्रश्न मांडता येऊ नयेत, शेतकऱ्यांना न्याय मिळू नये, मराठा, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रश्नच उपस्थित होऊ नये, यासाठी सरकार चर्चेपासून पळ काढत असल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. मंत्र्यांच्या बंगल्यावर जरुर खर्च करा पण आधी शेतकऱ्यांना पैसा द्या, अशी मागणीही फडणवीस यांनी केली आहे. दिल्ली, अमेरिकेवर बोलल्याने राज्याचे प्रश्न सुटणार नाहीत, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.

राज्यात शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे. त्यांना बांधावर जाऊन दिलेले आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी अद्याप पूर्ण केले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर, मराठा, ओबीसी समाजावर अन्याय करणाऱ्या सरकारविरोधात आम्ही आवाज बुलंद करू, असा इशाराही फडणवीसांनी दिला. तर विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यासमोर मराठा आरक्षण, शेतकरी मदत, कोरोना असे अनेक प्रश्न असताना त्यावर चर्चाच करायची नाही म्हणून दोन दिवसाचे हिवाळी अधिवेशन ठेवल्याचा आरोप केला.

विधानसभेत गदारोळ

आज विधानसभेत कामकाजाला सुरुवात होताच विरोधकांनी गदारोळ सुरू केला. मराठा आरक्षण आणि अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी विरोधकांनी केली. यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सरकार आणि विरोधी पक्षाने एकत्रित बैठक घेत नियमावली तयार करण्याचे आवाहन केले. कामकाजाला सुरुवात होण्याआधीच भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार उभे राहिले आणि कामकाजाची नियमावली ठरवण्याची आवश्यकता असल्याचे सांगत अधिवेशन दोन दिवस ठेवल्याबद्दल संताप व्यक्त केला.

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनीही अधिवेशनाच्या कालावधीबाबत नाराजी व्यक्त केली. दोन दिवसांचे अधिवेशन लोकशाहीला परवडणार नाही. आमदारांना वेळ अपुरा पडतो. त्यांना प्रश्न मांडता येत नाहीत आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देता येत नाही, असे पटोले म्हणाले. इतर राज्यांप्रमाणे आठ ते दहा दिवसांचे अधिवेशन घेतले जाऊ शकते. पुढील अधिवेशन नियमित होईल अशी कार्यवाही करण्याची आवश्यकताही त्यांनी बोलून दाखवली.

 

First Published on: December 14, 2020 10:59 AM
Exit mobile version