आजपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन; विरोधक-सत्ताधारी सज्ज, कोणते मुद्दे गाजणार?

आजपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन; विरोधक-सत्ताधारी सज्ज, कोणते मुद्दे गाजणार?

नागपूर – महापुरुषांबाबत केलेली वादग्रस्त वक्तव्ये, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, पीक विम्यातील शेतकऱ्यांची फसवणूक यासह महाराष्ट्रातील अनेक मुद्द्यांवर आजपासून नागपुरात राज्याच्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात खडाजंगी होणार आहे. आजपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पदावर विराजमान झाल्यापासून त्यांचं हे दुसरं अधिवेशन असणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या प्रश्नांवर विधिमंडळात हल्लाबोल होण्याची शक्यता आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे तिन्ही पक्ष गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झाले आहेत. राज्यातील विविध मुद्द्यांवर सरकारला घेरल्याने यंदाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. नुकत्याच झालेल्या महामोर्चाच्या निमित्ताने विधिमंडळ अधिवेशनाची रंगीत तालीम झाली असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे यंदाच्या अधिवेशनात कोणते मुद्दे चर्चिले जातात, कोणत्या मुद्द्यांवर तोडगा निघतो, कामकाज किती वेळ चालतंय, विरोधक काय भूमिका घेतात, सत्ताधारी कसे प्रत्युत्तर देतायत हे पाहावं लागणार आहे.

कोरोना संसर्गामुळे सलग दोन वर्षे नागपूरला राज्य विधिमंडळाचे अधिवेशन होऊ शकले नाही. आता कोरोनाची साथ नियंत्रणात आल्याने नागपूर अधिवेशनासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षात जोरदार उत्साह आहे. अधिवेशनाची तयारी पूर्ण झाली असून अधिवेशनानिमित्त येणारे मंत्री, आमदार, अधिकारी यांच्या स्वागतासाठी संत्रानगरी सज्ज झाली आहे. पोलीस प्रशासनाने विधान मंडळ परिसरात चोख बंदोबस्त ठेवला आहे.

हिवाळी अधिवेशाच्या सुरुवातीलाच आज सकाळी १० वाजता नागपुरात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. तसंच, सायंकाळी चार वाजताही बैठक होणार आहे. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे, विधान परिषदेच्या कामकाजातही उद्धव ठाकरे सहभागी होण्याची शक्यता आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात होऊ घातलेले लाखो कोटी रुपये गुंतवणुकीचे प्रकल्प गुजरातला गेले. विशेषतः वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षात आरोप-प्रत्यारोप रंगले होते. वेदांता- फॉक्सकॉनपाठोपाठ अन्य प्रकल्पही गुजरातला गेले. त्यावरून विरोधी पक्षाने सरकारला अधिवेशनात उघडे पाडण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे हा मुद्दा अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे. याशिवाय ओला दुष्काळ जाहीर करणे, अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना मदत, वाढती बेरोजगारी, महागाई तसेच विदर्भ आणि मराठवाड्याच्या प्रश्नावरून अधिवेशनात गदारोळ होऊ शकतो.

या मुद्द्यांवर गाजणार अधिवेशन
* वसईतील श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर राज्य सरकारने आंतरधर्मीय विवाहासंदर्भात नेमलेली समिती
* लेखक कोबाद गांधी यांच्या पुस्तकाला जाहीर झालेला पुरस्कार रद्द केल्यानंतर साहित्यिकांनी शासकीय समितीचे दिलेले राजीनामे
* शिंदे गटातील आमदारांच्या संरक्षणासाठी पोलिसांच्या निर्भया पथकातील वाहनांचा वापर

विधानसभा, विधानपरिषदेतील कामकाजे नियोजन

19 डिसेंबर ( सोमवार)

1) अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवणे.
2) सन 2022- 23 च्या पुरवण्या मागण्या सादर करणे.

20, 21 डिसेंबर ( मंगळवार, बुधवार)

शासकीय कामकाज

22 डिसेंबर ( गुरुवार)

1) शासकीय कामकाज
2) पुरवणी मागण्यांवर चर्चा व मतदान (पहिला दिवस )

23 डिसेंबर ( शुक्रवार)

1) शासकीय कामकाज
2) पुरवणी मागण्यांवर चर्चा व मतदान (दुसरा व शेवटचा दिवस )
३) पुरवणी विनियोजन विधेयक
4) अशासकीय कामकाज

24, 25 डिसेंबर (शनिवार, रविवार) – सुट्टी

26, 27, 28, 29 डिसेंबर (सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार)
शासकीय कामकाज

30 डिसेंबर ( शुक्रवार)

1) शासकीय कामकाज
2) अशासकीय कामकाज

31 डिसेंबर, 01 जानेवारी ( शनिवार, रविवार)

सुट्टी

First Published on: December 19, 2022 7:48 AM
Exit mobile version