तब्बल २१ कोटी किंमतीचे ७ किलो युरेनियम जप्त, महाराष्ट्र ATS ची मोठी कारवाई

तब्बल २१ कोटी किंमतीचे ७ किलो युरेनियम जप्त, महाराष्ट्र ATS ची मोठी कारवाई

महाराष्ट्र दशशतवाद विरोधी पथक (ATS)ने तब्बल ७ किलो युरेनियमन जप्त करण्याची मोठी कारवाई आज गुरूवारी केली. एटीएसच्या नागपाडा युनिटने ही मोठी कामगिरी पार पाडली आहे. या कारवाईदरम्यान २१ कोटी ३० लाख किमतीचे युरेनियम हस्तगत करण्यात आले आहे. मानवी शरीरासाठी अत्यंत घातक अशा स्वरूपाचे हे युरेनियम असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे युरेनियमन विक्रीच्या प्रयत्नात असणाऱ्या दोन आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले आहे. युरेनियम विक्रीसाठी ग्राहक शोधत असणाऱ्या दोघांना एटीएसच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. एटीएसने या प्रकरणात दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

जिगर पांड्या (२७) आणि अबू ताहीर (३१) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. जप्त करण्यात आलेले युरेनियम हे भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. या तपासणी दरम्यान मानवी जीवनासाठी हे युरेनियम अत्यंत घातक असल्याचे स्पष्ट झाले आहे. एटीएसने या प्रकरणात अॅटोमिक एनर्जी कायद्याअंतर्गत (१९६२) गुन्हा दाखल करून या प्रकरणातील तपासाला सुरूवात केली आहे.

एटीएसच्या पोलिस निरीक्षक संतोष भालेकर यांना सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिगर पांड्या नावाचा व्यक्ती हा ठाण्यात अनधिकृतपणे युरेनियमनच्या स्वरूपातील तुकड्यांची विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळेच नागपाडा एटीएसने या प्रकरणात सापळा रचला होता. पोलिस निरीक्षक भालेकर यांच्या टीमने यशस्वीरीत्या हा सापळा लावून जिगर पांड्याला अटक केली. मानखुर्द येथे राहणाऱ्या अबु ताहीर नावाच्या व्यक्तीने जिगर पांड्याला युरेनियम पुरवले होते. त्यामुळे नागपाडा युनिटने कचरा वेचक संघटनेच्या माध्यमातून मानखुर्द येथे छापा टाकून अबु ताहीरला अटक केली. त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलेले युरेनियम जप्त करत पंचनामाही करण्यात आला.

हे जप्त केलेले युरेनियम बीएआरसी, मुंबई येथे पाठवण्यात आले. तपासणीनंतर प्राप्त झालेल्या अहवालानंतर नैसर्गिक रूपात आढळणारे युरेनियम हे अतिशय घातक आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात विकिरणे असल्याने मानवी शरीरासाठी अत्यंत घातक असे हे युरेनियम आहे. या संपुर्ण तपासणीनंतर अॅटोमिक एनर्जी कायदा १९६२ नुसार कारवाई करण्यात आली आहे. या युरेनियमचे बाजारमूल्य २१ कोटी ३० लाख इतकी आहे.


 

First Published on: May 6, 2021 12:42 PM
Exit mobile version