‘जनाची नाही, किमान मनाची बाळगा’; नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

‘जनाची नाही, किमान मनाची बाळगा’; नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवर भाजप खासदार नारायण राणे यांनी राज्य सरकारसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री मृतांची संख्या जाहीर करतात. जे नाही ते सांगतात. त्यापेक्षा ते उपलब्ध करा. मुख्यमंत्र्यांना जनाची नाही तर मनाची तरी आहे का? मातोश्रीच्या पिंजऱ्यातून बाहेर या, असा हल्लाबोल नारायण राणे यांनी केला. नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला.

राज्यात कोरोना वाढत आहे. मात्र, महाराष्ट्र सरकार कोरोनावर उपाययोजना करायला, रुग्णांना आवश्यक औषधं द्यायला, कोरोना हाताळायला अपयशी झालं आहे. महाराष्ट्रात ६० हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे पाप राज्य सरकारचं, मुख्यमंत्र्यांचं आहे. देशात सर्वाधिक मृत्यूमध्ये महाराष्ट्र नंबर १ वर आहे. ४१ टक्के मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत, असं नारायण राणे म्हणाले. कोरोना रोखण्यासाठी उपाय म्हणून वारंवार धमकी देत होते की, लॉडाऊन लागणार, जसं काय महाराष्ट्र विकत घेतला आहे, अशा पद्धतीने दमदाटी करत होते. अखेर शेवटी त्यांनी अघोषित संचारबंदी सुरु केली, असं नारायण राणे म्हणाले.

लॉकडाऊनचा परिणाम होत नाही आहे. बाजारपेठा सकाळी सुरु होत्या. लोकांनी आदेशाला न जुमानता बाजारपेठेत का जात आहेत? याचा सरकारने विचार करावा. नागरिक लॉकडाऊनच्या भीतीनं बाजारपेठ, किराणा दुकानांमध्ये गर्दी करत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात ठाकरे सरकार अपयशी झालं आहे, अशी टीका नारायण राणे यांनी केली.

नारायण राणे यांनी सरकारच्या पॅकेजवर देखील टीका केली. रिक्षाचालकांना दीड हजाराची मदत दिली. त्यातून पूर्ण कुटुंबाचं पालनपोषण होणार का? ५ जणांचं कुटुंब महिना दीड हजारात कसं भागवणार? असा सवाल राणेंनी केला. व्यवसाय बंद असताना जीएसटी का सुरु आहे? भिकाऱ्यांना रस्त्यांवर उपाशी मारणार आहात का? अशी प्रश्नांची सरबत्तीच राज्य सरकारवर केली.

या सरकारमुळे महाराष्ट्राची आर्थिक स्थिती भयावह झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या रकमेतून ३० टक्के रक्कम कोरोनासाठी घोषित केली आहे. ठाकरे सरकार फसवाफसवी करतंय. अर्थमंत्री फक्त आकडेवारीत हेराफेरी करतात. अर्थसंकल्पात विकासाला पैसा दिलेला नाही. महाराष्ट्राचं अर्थकारण, अर्थव्यवस्था मुख्यमंत्र्यांना कळत नाही, असा हल्लाबोल राणेंनी केला. मुख्यमंत्र्यांनी मातोश्री पिंजऱ्यातून बाहेर पडावं, असं टीकास्त्र राणेंनी मुख्यमंत्र्यांवर डागलं.

सचिन वाझे प्रकरणावरुन देखील राणेंनी जोरदार हल्लाबोल केला. राज्यात कायदा व्यवस्था नाही आहे. सचिन वाझे एक आहेत. नजरेआड असलेले सचिन वाझे किती आहेत? यांना नको असलेली माणसं सचिन वाझे सारख्या माणसाकडून मारुन टाकण्याचं काम अजून चालू आहे, असा गंभीर आरोप राणेंनी केला. NIA च्या चौकशीतू कोणाची आणि कोणाच्या सांगण्यावरुन हत्या करणार होते बाहेर पडेल, असं देखील राणे म्हणाले. ठाकरे सरकारचा एककलमी धंदा भ्रष्टाचार.
कोरोना रोखण्यासाठी सर्व आरोग्य यंत्रणा त्वरित उपलब्ध करा, लॉकडाऊन उठवा, दुकानं खुली करा, अशी मागणी राणेंनी केली. कोरोना हातळण्यासाठी सरकारकडे बुद्धीमत्ता योग्य मार्गदर्शन नाही, अशी टीका राणेंनी सरकारवर केली.

मुख्यमंत्री फक्त बाधितांचे, मृतांचे आकडे जाहीर करतात. ज्या सोयी अपुऱअया आहेत त्या उपलब्ध करा. रुग्णांना हॉस्पिटलमध्ये न्यायला अँबुलन्स नाही आहे. त्यासाठी वाझेची गाडी मातोश्रीहून मागवणार का? असं टीकास्त्र राणेंनी डागलं.

 

First Published on: April 16, 2021 12:40 PM
Exit mobile version