Maharashtra Floods : पुराचा फटका राज्यातील ४५७ शाळांना – शिक्षणमंत्री

Maharashtra Floods : पुराचा फटका राज्यातील ४५७ शाळांना – शिक्षणमंत्री

Maharashtra Floods : पूरग्रस्त भागात मदत करुन परतलेल्या पालिका कर्मचा-यांची आरोग्य तपासणी

महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे आणि पुराच्या पाण्यामुळे एकुण ४५७ शाळांना याचा फटका बसला अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. राज्य मंत्रीमंडळ बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. राज्यात पुराचा फटका बसलेला आणखी जिल्ह्यांमधील शाळांची माहिती आम्ही घेत आहोत. आमच्या प्राथमिक बैठकांमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार राज्यात ४५७ शाळांना पुराच्या पाण्याचा फटका बसलेला आहे. त्यामुळे या शाळांसाठी शालेय शिक्षण विभागाकडून २८ कोटी २० लाख ७६ हजार रूपयांची मागणी आम्ही आपत्ती विभागाकडे केली आहे. पुराच्या पाण्याचा आणि अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शाळांमध्ये कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, रायगड, ठाणे, पालघर, पुणे या जिल्ह्यातील शाळांचा समावेश आहे.

अनेक जिल्ह्यातून शाळांच्या नुकसानाची प्राथमिक माहिती आम्हाला आलेली आहे. या शाळांच्या दुरूस्तीसाठी आम्ही २८ कोटी २० लाखांची मागणी केली आहे. या शाळांमध्ये मुलांना शिक्षण देण्यासाठी येत्या चार ते पाच दिवसांमध्ये ऑनलाईन की ऑफलाईन पद्धतीने शिक्षण द्यायचे याबाबतचा निर्णय घेण्यात येईल असेही शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच या विद्यार्थ्यांना कोणत्या पद्धतीने शिक्षण देता येईल यासाठीचा फीडबॅक स्थानिक पातळीवरून घेणार आहोत असेही त्यांनी सांगितले. नुकसानग्रस्त शाळांच्या पुन्हा उभारणीसाठी आपत्कालीन विभागाकडे निधीची मागणी केली आहे असेही त्या म्हणाल्या.

राज्यातील काही भागातून विद्यार्थ्यांची पुस्तके भिजल्याची माहिती आली आहे. रत्नागिरी आणि चिपळूण या भागातून शालेय पुस्तके भिजल्याच्या तक्रारी शालेय शिक्षण विभागाकडे आल्या आहेत. याठिकाणी येत्या दोन ते चार दिवसांमध्ये शालेय साहित्य आणि पुस्तके देण्याचे आदेश दिले आहेत. तर कोल्हापूरच्या पन्हाळा आणि गगनबावडा येथून शालेय पोषण आहार भिजण्याच्या तक्रारी आल्या आहेत. याठिकाणी तांदूळ आणि शालेय पोषण आहारातील गोष्टी पुरवण्याचे आजच्या बैठकीत ठरले असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांपर्यंत तसेच शाळेच्या ठिकाणी पोहचण्यात विभागातील अधिकाऱ्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे शालेय शिक्षणाच्या बाबतीत कोणत्या पद्धतीने शिक्षण देता येईल यासाठीचा निर्णय आम्ही लवकरच घेऊ असेही त्यांनी सांगितले.


 

First Published on: July 28, 2021 8:34 PM
Exit mobile version