दोन डोस घेतलेल्यांसाठी निर्बंध शिथिल होणार – राजेश टोपे

दोन डोस घेतलेल्यांसाठी निर्बंध शिथिल होणार – राजेश टोपे

आफ्रिकेच्या भागातून येणाऱ्यांसाठी ७२ तासांची RTPCR टेस्ट बंधनकारक, आरोग्यमंत्र्यांची माहिती

कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांसाठी काही निर्बंध शिथील करायला हवेत, याबाबत कुणाचेही दुमत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कोविड टास्क फोर्स लवकरच या संदर्भात निर्णय घेतील, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी  बुधवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. करोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू आहे. त्यामुळे अनेक गोष्टींवरचे निर्बंध ‘जैसे थे’ असून धोका नसेल तर निर्बंध उठवावेत, अशी मागणी लोकांकडून होत आहे.  यापार्श्वभूमीवर टोपे यांनी तिसऱ्या लाटेसंबंधी महत्त्वाचे विधान केले.  करोनाची तिसरी लाट नेमकी कधी येणार की येणारच नाही, याचे उत्तर आपल्यावर अवलंबून आहे, असे टोपे म्हणाल.

प्रशासनाने कोरोना बाबतीत घालून दिलेले नियम आणि निर्बंध जनतेने पाळले. कोविडपासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली तर ही लाट थोपवता येऊ शकते,’असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी आणि त्यांच्यावरील अन्य निर्बंध उठवावेत, अशी एक मागणी होत आहे. त्याबाबत विचारले असता ते म्हणाले, राज्य सरकारच्या पातळीवरही याबाबत चर्चा सुरू आहे. जसजसे लसीकरण होत आहे, तसतसे निर्बंध शिथील करण्याची राज्य सरकारची भूमिका आहेच. अजिबात निर्बंध उठत नाहीत असे नाही. पूर्वी विमानाने मुंबईत येणाऱ्या प्रवाशाचा करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह नसेल तर त्यांना प्रवेश मिळायचा नाही. अशा प्रवाशांना थेट विलगीकरण केले जायचे. आता तसे होत नाही. लसीचे दोन डोस घेतले असतील तर त्याला प्रवेश दिला जातो.

केंद्राने लसीकरणाचा वेग वाढवावा

दोन महिन्यात राज्याचे लसीकरण १०० टक्के पूर्ण करण्याची आपली क्षमता आहे. पण त्या गतीने लस उपलब्ध व्हायला हवी. केंद्राने लसीकरणाला वेग देण्यासाठी मदत करायला हवी. जर ६० ते ७० टक्के लसीकरण झाले तर सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होईल. ती या  संसर्गात गरजेची असल्याचे टोपे यांनी सांगितले.

सर्वसामान्यांना रेल्वे प्रवासाची मुभा नाही

मुंबईतील उपनगरी रेल्वेच्या बाबतीत मात्र परिस्थिती वेगळी आहे. लोकलमध्ये होणारी गर्दी पाहता प्रत्येक प्रवाशाला थांबवून त्यांच्याकडील लसीकरणाच्या प्रमाणपत्राची तपासणी करता येईल का? रेल्वेकडे तेवढे मनुष्यबळ आहे का? हे प्रश्न आहेत. त्यामुळे अद्याप काही निर्णय झालेले नाहीत, असे सांगत राजेश टोपे यांनी नजीकच्या काळात रेल्वे प्रवासाची मुभा मिळणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले.


 

First Published on: July 21, 2021 6:20 PM
Exit mobile version