तुकाराम मुंढेंच्या १२ वर्षांत ११ बदल्या

तुकाराम मुंढेंच्या १२ वर्षांत ११ बदल्या

तुकाराम मुंढेंची पुन्हा एकदा बदली

नाशिक महापालिकेचे कर्तव्यदक्ष आयुक्त तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झाली आहे. तुकाराम मुंढेंच्या जागी उस्मानाबाद जिल्ह्याअधिकारी राधाकृष्ण गमे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्त होतात की ठाणे महापालिका आयुक्त म्हणून, याकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. तुकाराम मुंडेची नियुक्ती या दोन्ही महापालिकेपैकी कुठेही झाली तर शिवसेनेची डोकेदुखी वाढणार हे मात्र निश्चित आहे. मुंढे त्यांच्या कामाच्या शिस्तप्रिय शैलीसाठी नेहमीच ओळखले जातात. मात्र, गेल्या काही काळापासून नाशिक महापालिकेतल्या नगरसेवकांशी मुंढे यांचे सातत्याने वाद होत होते. यामुळे तुकाराम मुंढेंची बदली करा अशी मागणी भाजपसहीत सर्व पक्षांनी केली होती. त्यामुळे अखेर त्यांच्या बदलीचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचं सांगितलं जात आहे.

मुंढेची बारावी बदली

दरम्यान, तुकाराम मुंढे यांची नाशिकमध्ये झालेली नियुक्ती ही ११ वी नियुक्ती होती. त्यामुळे आता नव्याने होणारी त्यांची नियुक्ती १२वी नियुक्ती असणार आहे. नाशिकच्या आधी तुकाराम मुंढे नवी मुंबईत आयुक्त होते. त्याआधी ते पुण्यात PMPL चे आयुक्त होते. तर, त्याआधी मुंढे पिंपरी-चिंचवडचे आयुक्त होते. या सगळ्याच ठिकाणी मुंडे यांनी कणखरपणे काम केले. या सर्व ठिकाणी त्यांनी जास्त महसूल मिळवून दिला. मात्र, त्यांचं लोकप्रितिनिधींशी कधीच जमलं नाही. त्यामुळे सर्वच ठिकाणी लोकप्रतिनिधी विरूद्ध प्रशासन असा संघर्ष पाहायला मिळाला. दरम्यान, नाशिकनंतर आता तुकाराम मुंढेंची बदली कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं.

बदलीची वारंवार मागणी

नियमांवर बोट ठेवून आणि लोकप्रतिनिधींना कस्पटासमान वागणूक देणारे सनदी अधिकारी आणि नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे हे कोणत्याच महानगरपालिकेला नकोसे झाले होते. राज्यातल्या महापौरांच्या नागपूरमध्ये सुरू असलेल्या परिषदेत या आशयाचा ठराव मंजूर करण्यात आला होता. महापौर परिषदेत मुंढे यांच्या एककल्ली कारभाराचे पडसाद उमटले. या परिषदेत मुंढे यांना राज्यातील कुठल्याही महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती न देण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. याशिवाय आयुक्तांकडे पालिकेची सर्व सुत्रे न देता महापौरांना आर्थिक व प्रशासकीय अधिकार देण्याच्या मागण्या करण्यात आल्या होत्या.

First Published on: November 21, 2018 5:27 PM
Exit mobile version