राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर तब्बल ४० वर्षांनंतर राज्यातील मच्छीमारांसाठी नवा कायदा

राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर तब्बल ४० वर्षांनंतर राज्यातील मच्छीमारांसाठी नवा कायदा

प्रातिनिधिक फोटो

‘महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन (सुधारणा) अध्यादेशास ०६.१०.२०२१ रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाल्यानंतर हा नवा कायदा राज्यात कधी लागू होईल याकडे राज्यातील ७२० कि.मी. सागरी पट्ट्यातील मच्छीमार व मासेमारी व्यवसायाशी निगडित अनेकांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर राज्यपालांच्या स्वाक्षरीने हा अध्यादेश महाराष्ट्रात लागू झाला असल्याची माहिती राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी शुक्रवारी दिली. एलईडी आणि पर्ससीन मासेमारी तसेच महाराष्ट्राच्या जलधी क्षेत्रात घुसून अवैध मासेमारी करणाऱ्यां परराज्यांतील नौकांविरोधात कठोरात-कठोर दंडात्मक तरतुदी करण्यात आल्याने हा नवा कायदा पारंपरिक मच्छीमारांच्या हिताचा ठरणार असल्याचे मत मंत्री अस्लम शेख यांनी व्यक्त केले आहे.

राज्याच्या मासेमारी क्षेत्रावर दूरगामी परिणाम करणाऱ्या या कायद्याची ठळक वैशिष्ट्ये

महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन (सुधारणा) अध्यादेश, २०२१ असं या नव्या कायद्याचं नाव असेल. मंत्री शेख म्हणाले की गेल्या ४० वर्षांमध्ये मत्स्यव्यवसाय व मासेमारीच्या पद्धती बदललेल्या आहेत. त्यामुळे नव्या कायद्याची गरज निर्माण झाली होती. मागील १० वर्षांपासून अनधिकृत मासेमारीला पायबंद बसावा यासाठी सुधारीत कायद्याची मागणी मच्छीमार बांधवांकडून केली जात होती. मच्छीमार बांधवांशी चर्चा करुन अनेक तरतुदी कायद्यात समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत.

महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन (सुधारणा) अध्यादेश, २०२१

(महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ हा ४ ऑगस्ट १९८२ सालापासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये लागू झाला. हा कायदा लागू केल्यापासून बराचसा काळ लोटलेला आहे. या काळात मत्स्यव्यवसाय व मासेमारीच्या पद्धती बदललेल्या आहेत. अभिनिर्णय अधिकारी म्हणून तहसीलदारांपुढे प्रलंबित असणाऱ्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे तहसीलदाराऐवजी मत्स्यव्यवसाय अधिकाऱ्यास अभिनिर्णय अधिकारी म्हणून नव्या अध्यादेशात घोषित करण्यात आले आहे. जुन्या अधिनियमात घोषित करण्यात आलेल्या शास्ती त्याच्या अधिनियमितीपासून बदलण्यात आलेल्या नाहीत. या सर्व बाबी विचारात घेऊन कायद्यात बदल करण्यात आलेले आहेत. )

 

First Published on: November 26, 2021 1:21 PM
Exit mobile version