Maharashtra Police : आता हवालदार लवकरच होणार पोलीस उपनिरीक्षक, गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची माहिती

Maharashtra Police : आता हवालदार लवकरच होणार पोलीस उपनिरीक्षक, गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची माहिती

मुंबईः राज्यातील अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक अधिकारी होता यावे, यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रस्तावाला अखेर ठाकरेंच्या मंत्रिमंडळानं मान्यता दिलीय. त्यामुळे पोलीस दलाच्या बळकटीकरणाला चालना मिळणार असल्याचंही सांगितलं जात आहे. गेल्या वर्षी ठाकरे सरकारनं पोलिसांच्या पदोन्नतीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. त्याबाबतच आज शासन निर्णय जाहीर झालाय. विशेष म्हणजे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिलीय.

राज्यातील हजारो पोलीस हवालदारांचे पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण करणारा शासन निर्णय आज झाला आहे. यामुळे पोलीस दलाच्या बळकटीकरणास चालना मिळेल तसेच गुन्ह्यांची उकल होण्यास व गुन्हे रोखण्यास मदत होईल, असा विश्वास गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केलाय. या निर्णयामुळे पोलीस दलातील पोलीस हवालदार आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक या संवर्गातील वाढीमुळे एकूण तपासी अधिकाऱ्यांच्या संख्येत भरीव वाढ होणार असल्याने पोलीस अधिकाऱ्यांवरील ताण निश्चितपणे कमी होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

राज्यातील अंमलदारांना वर्षानुवर्षे सेवेनंतरही पोलीस उपनिरीक्षक या अधिकारी पदावर पोहचता येत नसल्याने त्यांना पदोन्नतीचा लाभ देऊन अधिकारी होता यावे, या दृष्टिकोनातून हा प्रस्ताव गृहविभागाने तयार केला होता. या निर्णयामुळे पोलीस शिपाई संवर्गातील कर्मचाऱ्यास त्याच्या सेवाकालावधीत पदोन्नतीच्या 3 संधी मिळून अधिकारी पदावरून सेवानिवृत्त होता येईल. या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस महासंचालक स्तरावर सुकाणू समिती गठीत करण्यात येईल, अशी माहितीही गृहमंत्र्यांनी दिली. या पदोन्नतीचा थेट फायदा भविष्यात हजारो पोलीस शिपाई हवालदार, सहायक पोलीस निरीक्षक यांना होणार आहे. यामुळे पोलीस दलाची प्रतिमा सुधारण्यास मदत होईल शिवाय पोलीस दलास सद्यस्थितीत प्रत्यक्ष कामकाजाकरीता मिळणाऱ्या मानवी दिवसांमध्येही मोठी वाढ होईल, असंही गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणालेत.


तसेच पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदोन्नती साखळीमधील पोलीस नाईक या संवर्गातील 38 हजार 169 पदे व्यपगत करण्यात आली असून, ती पोलीस शिपाई, पोलीस हवालदार व सहायक पोलीस उपनिरीक्षक या संवर्गात वर्ग करण्यात येत आहे. यामुळे आता पुनर्रचनेनंतर पोलीस शिपायांची पदे 1 लाख 8 हजार 58, पोलीस हवालदारांची पदे 51 हजार 210, सहायक पोलीस उपनिरीक्षकांची पदे 17 हजार 71 वाढतील, अशीही माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे या पदोन्नतीचा लाभ भविष्यात हजारो पोलीस शिपाई हवालदार, सहायक पोलीस निरीक्षक यांना होणार आहे. यामुळे पोलीस दलाची प्रतिमा सुधारण्यास मदत होईल, शिवाय पोलीस दलास सद्यस्थितीत प्रत्यक्ष कामकाजाकरिता मिळणाऱ्या मानवी दिवसांमध्येही मोठी वाढ होणार असल्याचंही सांगितलं जात आहे.


हेही वाचाः महापालिका निवडणुका असल्याने पालिकेतील शिपायांवरही रेड टाकतील – संजय राऊत

First Published on: February 25, 2022 5:20 PM
Exit mobile version