तनुश्री दत्ताच्या विरोधात अब्रुनुकसानीची तक्रार

तनुश्री दत्ताच्या विरोधात अब्रुनुकसानीची तक्रार

तनुश्री दत्ता

एकेकाळी मिस इंडिया आणि नंतर बॉलीवूड अभिनेत्री राहिलेली तनुश्री दत्ता सध्या मीडियामध्ये चर्चेचा विषय बनली आहे. गुरुवारी तिच्यावर महाराष्ट्र पोलिसात अब्रुनुकसानीचा दावा करणारी तक्रार दाखल करण्यात आली असून ही तक्रार तिने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बीडच्या मनसे कार्यकर्त्याने केली तक्रार 

महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यामधील कैज पोलीस ठाण्यात मनसेचे जिल्हा प्रमुख अध्यक्ष सुमंत दास यांनी काल सायंकाळी तनुश्रीच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर आज अब्रुनुकसानीचा दावा तिच्यावर करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. ‘तनुश्री दत्ताच्या विरोधात कलम ५०० च्या अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या नुसार संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जाणार आहे. आम्ही तक्रारदाराला कोर्टात दाद मागण्याचेही सुचवले आहे,’ असे पोलीस अधिकारी म्हणाले.

राज ठाकरेंविरोधात केलेल्या वक्तव्याने कार्यकर्ते नाराज

१० वर्षांपूर्वी म्हणजेच २००८ मध्ये ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेता नाना पाटेकर यांनी विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा अभिनेत्री तनुश्री दत्ताने केल्यानंतर अवघ्या बॉलिवूड इंडस्ट्रीसोबतच मराठी चित्रपटसृष्टीमध्ये देखील खळबळ माजली. त्यानंतर तिने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंबाबत केलेलं वक्तव्य आणि त्यांच्यावर केलेला आरोप यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली. ‘नालायक स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा असंच होतं’, अशा शब्दांत तनुश्रीने राज ठाकरेंबद्दल वक्तव्य केलं होत. यावर आता मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी तनुश्रीविरोधातच तक्रार दाखल केली आहे.

First Published on: October 4, 2018 9:07 PM
Exit mobile version