महाविकास आघाडीचे सरकार येताच पोलीस दलात मेगाभरती

महाविकास आघाडीचे सरकार येताच पोलीस दलात मेगाभरती

पोलीस खात्यात लवकरच मेगाभरती

मागच्या पाच वर्षात देशातील रोजगार घटला, असे सांगितले जात होते. नुकतेच स्टेट बँक ऑफ इंडियाने देखील चालू वर्षात १६ लाख नोकऱ्या कमी होऊ शकतात, असा अहवाल दिला आहे. मात्र राज्यात सत्ताबदल होताच गृह विभागाने पोलीस दलात ७ ते ८ हजार पदांची भरती करणार असल्याचे सांगितले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भरतीबाबत अमरावती येथे सुतोवाच केले असून या मेगाभरतीमुळे राज्यातील पोलीस खात्यावर आलेला ताण कमी होण्यास थोडी मदत होणार आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख हे दिवंगत जे. डी. पाटील उपाख्य बाळासाहेब सांगळूदकर यांच्या ५१ व्या पुण्यतिथीनिमित्त दर्यापूर येथील श्रीमती कोकिळाबाई गावंडे महिला महाविद्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. राज्याच्या ग्रामीण भागातील अनेक तरुण पोलीस भरतीसाठी अनेक वर्ष पर्यत्न करत असतात, अशा तरुणांसाठी ही दिलासादायक अशी बातमी आहे. गृहविभागाच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर तरुणांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार महिला अत्याचाराचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. विविध आंदोलने, उत्सवांनिमित्त सुरक्षा बंदोबस्त यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आव्हान गृह विभागासमोर आहे. नवीन भरती केल्यानंतर गृहविभागाला सक्षणपणे काम करण्यास मदत होईल. या कार्यक्रमात बोलत असताना अनिल देशमुख पुढे म्हणाले की, ग्रामीण भागातील तरुणांनी पोलीस भरतीसोबतच इतर स्पर्धापरिक्षांची देखील तयारी केली पाहीजे. तसेच शेतकऱ्यांसोबतच विद्यार्थी, बेरोजगार युवकांच्या आत्महत्या वाढल्या आहेत, याबाबत देखील त्यांनी चिंता व्यक्त केली.

First Published on: January 15, 2020 9:57 AM
Exit mobile version