Maharashtra Politics : शिंदेनी स्वार्थापोटी स्वाभिमान दिल्लीत गहाण टाकला; सुषमा अंधारेंचा घणाघात

Maharashtra Politics : शिंदेनी स्वार्थापोटी स्वाभिमान दिल्लीत गहाण टाकला; सुषमा अंधारेंचा घणाघात

नवी मुंबई : शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या पाठीत खंजीर खुपसून सत्तेत आलेला शिंदे गट हा विकृतीने झपाटलेला आहे. नकली शिंदेच्या शिवसेनेला दिल्लीत मुजरे आणि हुजरे घालावे लागत आहेत. स्वतःच्या स्वार्थापोटी त्यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्ली दरबारी गहाण टाकला आहे. महाराष्ट्रातील एकापाठोपाठ एक प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर यांना एक भ्र शब्द देखील काढता आला नाही, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला. महाविकास आघाडीच्यावतीने वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात महिला मेळावा शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्या बोलत होत्या. (Maharashtra Politics Eknath Shinde mortgaged his self-respect in Delhi sushama andhare)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात आयोजित मेळाव्याला मार्गदर्शन करताना सुषमा अंधारे यांनी शिंदेंचा खरपूस समाचार घेतला. सुषमा अंधारे म्हणाल्या की, राज्यातील सर्वात जास्त क्राईम रेट हा ठाणे आणि कल्याणमध्ये आहे. या दोन्ही भागांवर मुख्यमंत्र्यांचा प्रभाव आहे. येथे विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना हैराण केले जात आहे. महाराष्ट्रात फार्मसीचे कॉलेज मोठ्या प्रमाणात आहेत. दरवर्षी या कॉलेजमधून एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थी बाहेर पडतात. या विद्यार्थ्यांना राज्यातच रोजगार मिळावा यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात मल्टी ट्रक प्रोजेक्ट महाराष्ट्रात आणला होता. मात्र विद्यमान सरकारने हा प्रोजेक्ट नंतर अहमदाबादच्या घशात घातला. आपले वाटोळे करून गुजरातचे भले करणारे धोरण हे प्रकृती नसून विकृती आहे. ही विकृती ठेचून काढण्यासाठी लोकसभा निवडणुकीत राजन विचारे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असे आवाहनही सुषमा अंधारे यांनी यावेळी केले.

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : उमेदवारी नाकारल्यानंतर पूनम महाजन यांनी मोदींचे मानले आभार

ज्यांना उमेदवारच भेटत नाही त्यांच्या विजयाच्या बाता

ठाणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून टीका करताना सुषमा अंधारे यांनी ज्यांना दिल्लीवारी करूनही जागा मिळत नाही त्यांचा उमेदवार निश्चित नाही त्यांनी नवी मुंबई ठाण्यामध्ये येऊन आपलाच विजय होईल म्हणजे आश्चर्यच आहे. ठाणे लोकसभेसाठी शिंदे गटाचे दोन, तीन जण इच्छुक आहेत.त्यांनी आपले कोट शिवून ठेवले आहेत. त्यातील दोघांना शिवून ठेवलेले आपले कोट विकायची वेळ आली आहे. ठाणे लोकसभेसाठी साक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जरी उमेदवारी अर्ज भरला तरी महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचंड ताकती पुढे मोदींनाही विजयी होता येणार नाही, असेही अंधारे म्हणाल्या.

मोदीसह केंद्रातील मंत्र्यांना प्रचाराला बोलावण्याची नामुष्की

महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसांपासून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विकास कामांसाठी दौरे आणि लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने सभा सुरू आहेत, यावर टीका करताना सुषमा अंधारे यांनी राज्यातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील आणि प्रमुख नेत्यांना अपयश आल्याने त्यांना मोदींचा केंद्रातील मंत्र्यांचा आधार घ्यावा लागला, अशी टीका करत महाराष्ट्रातील जनता लोकशाही वाचवण्यासाठी मोदींना घरी बसून महाविकास आघाडीला पुन्हा सत्ता देईल, असा विश्वास व्यक्त केला.

हेही वाचा – Politics : शशिकांत शिदेंना अटक करण्याचा प्रयत्न केल्यास…; शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले

महाविकास आघाडीच्यावतीने महिला मेळाव्याचे आयोजन

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा महिला मेळावा पार पडला. या मेळाव्याला शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण, शिवसेना समन्वयक शिल्पा सरपोतदार, रेखा खोपकर, नंदिनी विचारे, जिल्हासंघटक रंजना शिंत्रे, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा पूनम पाटील, राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा सलुजा सुतार, विनया मढवी, आपच्या धनवंती बच्चन, कोमल वास्कर, तनुजा मढवी, वैशाली घोरपडे, स्नेहल सावंत, सुलोचना शिवानंद, विजया सुर्यवंशी, दर्शना कौशिक, हेमांगी सोनावणे, पूनम आगवणे आदी उपस्थित होते.

First Published on: April 27, 2024 11:14 PM
Exit mobile version