Maharashtra politics : विठ्ठल कारखान्यावरील जप्तीबद्दल रोहित पवार म्हणतात, सत्ता आल्यावर…

Maharashtra politics : विठ्ठल कारखान्यावरील जप्तीबद्दल रोहित पवार म्हणतात, सत्ता आल्यावर…

मुंबई : थकीत कर्जासंदर्भात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने पंढरपूर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई केली. ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत झालेल्या या कारवाईचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी याबाबत ट्वीट करत महायुतीला इशारा दिला आहे. (Maharashtra Politics: Rohit Pawar angry regarding action on Vitthal factory)

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अभिजित पाटील हे या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. लोकसभा निवडणूक प्रचारात सोलापूरमध्ये अभिजीत पाटील सक्रिय आहेत. अशातच राज्य सहकारी बँकेने कारखान्याची तीन गोडाऊन सील केली. तसेच कारखान्याच्या शटर ताबा नोटीस चिकटवण्यात आली आहे. जुन्या संचालक मंडळाने 430 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र हे कर्ज थकल्याचे प्रकरण पुण्याच्या डीआरटी न्यायालयात होते. न्यायालयाने काल, गुरुवारी स्थगिती उठवल्यानंतर बँकेच्या अधिकाऱ्यांनी लगचेच आज, शुक्रवारी श्री विठ्ठल कारखान्याची साखरेची गोडाऊन सील केली.

यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे. सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर जिल्ह्यातील वेणूनगर-गुरसाळे येथे असलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची तीन गोडाऊन दी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सील केले. अभिजित पाटील यांच्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील ही कारवाई म्हणजे माढा मतदारसंघात लख्खपणे दिसणाऱ्या पराभवाच्या भीतीने सुरू असलेली दडपशाही आहे, असा आरोप त्यांनी केला.

सोलापूरची स्वाभिमानी जनता या दडपशाहीचे चंद्रभागेमध्ये विसर्जन करून माढा मतदारसंघात विजयाची तुतारी फुंकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास व्यक्त करतानाच, आम्ही सर्वजण अभिजित पाटील आणि सर्व सभासद शेतकऱ्यांसोबत आहोत. या लढ्यात बोलवाल तेव्हा हजर राहू. कारवाई करणाऱ्यांनाही सांगतो की, कारखाना ही तुमची खासगी मालमत्ता नाही तर शेतकऱ्यांचा आहे. सत्ता आल्यावर सर्वांचा हिशोब कायदेशीर मार्गाने चुकता होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – Ajit Pawar : …म्हणून भाजपाने अजित पवारांना घोटाळ्यातून मुक्त केले, ठाकरे गटाचा हल्लाबोल


Edited by Manoj S. Joshi

First Published on: April 26, 2024 5:29 PM
Exit mobile version