Corona: महाराष्ट्राला प्लाझ्मा थेरेपीची परवानगी मिळाली!

Corona: महाराष्ट्राला प्लाझ्मा थेरेपीची परवानगी मिळाली!

कोरोनाच्या रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीच्या माध्यमातून उपचार करण्याची परवानगी मिळावी, यासाठी महाराष्ट्र सरकारने आयसीएमआर अर्थात इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्चकडे परवानगी मागितली होती. नुकतेच केंद्रीय आरोग्य पथक महाराष्ट्रातल्या मुंबई आणि पुणे या सर्वाधिक कोरोनाग्रस्त शहरांना भेट देऊ परतलं होतं. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला अखेर रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीच्या माध्यमातून उपचार करण्याची परवानगी मिळाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे. कोविड-१९वर जगभरात सध्या उपचार पद्धतींवर संशोधन सुरू आहे. प्लाझ्मा थेरेपीच्या माध्यमातून केलेल्या उपचारांना रुग्णांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचं काही ठिकाणी निदर्शनास आलं होतं. त्या आधारावर या पद्धतीचा व्यापक प्रमाणात वापर करण्याच्या दिशेने हे संशोधन करण्याची परवानगी महाराष्ट्र सरकारने मागितली होती. फायनान्शिअल एक्स्प्रेसने याबाबतचे वृत्त दिले आहे.

यासंदर्भात माहिती देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, ‘आम्ही आयसीएमआरकडे परवानगी मागितली होती. अखेर आम्हाला ती परवानगी मिळाली आहे. प्रातिनिधीक स्वरूपात सुरुवातीला संशोधनाच्या उद्देशाने या थेरेपीचा काही रुग्णांवर वापर केला जाईल. जे रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गातून बरे झाले आहेत, त्यांच्या रक्तात अँटिबॉडीज तयार झालेल्या असतात. जर पुरेशी काळजी घेऊन त्यांचा प्लाझ्मा दुसऱ्या रुग्णांवर वापरला, तर त्याचा चांगला परिणाम दिसून येत असल्याचं समोर आलं आहे’.

काय आहे प्लाझ्मा थेरेपी?

प्लाझ्मा थेरेपी ही कोरोना होऊन बऱ्या झालेल्या रुग्णाच्या पेशींवर अवलंबून असते. अशा रुग्णांच्या शरीरात कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक तितकी प्रतिकारक्षमता तयार झालेली असते. त्यांच्या रक्तात अँटिबॉडीज तयार झालेल्या असतात. त्यामुळे त्यांच्या रक्ताचे हिस्से दुसऱ्या कोरोनाग्रस्त रुग्णाच्या शरीरात चढवल्यास त्याच्या रक्तात देखील कोरोनाचा मुकाबला करणाऱ्या अँटिबॉडीजची उपलब्धता वाढून कोरोनाचा विषाणू निष्प्रभ होऊ शकतो, या गृहीतकावर प्लाझ्मा थेरेपी आधारित आहे.

केंद्रीय पथकाच्या अंदाजाकडे दुर्लक्ष करा!

दरम्यान, यावेळी बोलाताना राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्य पथकाच्या मुंबईतील संभाव्य रुग्णसंख्येच्या अंदाजावर देखील भूमिका स्पष्ट केली. राज्यात ३० एप्रिलपर्यंत ४२ हजार रुग्णसंख्या असेल, या केंद्रीय पथकाच्या अंदाजावर ते म्हणाले, ‘हा अंदाज व्यक्त करण्याची प्रक्रिया वैज्ञानिक पद्धतीवर अवलंबून आहे. पण त्यासाठी पथकाने महाराष्ट्राचा डबलिंग रेट (रुग्णसंख्या आहे त्याच्या दुप्पट होण्यासाठी लागणारे दिवस) फक्त ३.८ दिवस इतका धरला आहे. पण खरंतर राज्याचा डबलिंग रेट सध्या ७ दिवस इतका वाढला आहे. तसेच, या प्रक्रियेमध्ये सध्याचा रुग्णसंख्या वाढीचा दर असाच कायम राहील, असं गृहित धरण्यात आलं आहे. पण ते चुकीचं असून राज्यातल्या हॉटस्पॉट्सची संख्या १४ वरून ५ वर आली आहे. शिवाय, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा दर देखील खाली आला आहे. त्यामुळे लोकांनी या अंदाजाकडे दुर्लक्ष करावं आणि घाबरून जाऊ नये’.

First Published on: April 23, 2020 2:55 PM
Exit mobile version