केंद्राकडून महाराष्ट्राला रेमडेसिवीरचा पुरवठा वाढला; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मानले पंतप्रधानांचे आभार 

केंद्राकडून महाराष्ट्राला रेमडेसिवीरचा पुरवठा वाढला; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मानले पंतप्रधानांचे आभार 

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे आरोग्य विभागावर ताण आला आहे. त्यातच कोरोनावर उपायकारक ठरणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा राज्यात तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र, कोरोना रुग्णांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या रेमडेसिवीरचा पुरवठा महाराष्ट्रात वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. येत्या ३० एप्रिलपर्यंत राज्याला ४ लाख ३५ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन मिळणार आहेत. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. हा पुरवठा पूर्वी २ लाख ६९ हजार व्हायल्स एवढा होता, तो आता वाढवून ४ लाख ३५ हजार करण्यात आला आहे.

राज्यात रेमडेसिवीरच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या समस्येकडे उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते. तसेच पंतप्रधानांना देखील पत्राद्वारे हा पुरवठा वाढवण्याची विनंती केली होती. आज केंद्राने राज्यासाठी ३० एप्रिलपर्यंत ४ लाख ३५ हजार व्हायल्सचा पुरवठा देण्याचे आदेश काढले आहेत.

केंद्रीय आरोग्य खात्याच्या औषध विभागाचे सहसचिव नवदीप रिनवा यांचे यासंदर्भातील पत्र प्राप्त राज्याला झाले असून हा पुरवठा २१ एप्रिल ते ३१ एप्रिलपर्यंतचा असणार आहे. देशभरातील राज्यांच्या मागणीप्रमाणे १६ लाख रेमडेसिवीर व्हायल्स केंद्र पुरविणार असून सात परवानाधारक उत्पादक कंपन्यांना प्राधान्याने हा पुरवठा करण्यास सांगण्यात आले आहे.

First Published on: April 24, 2021 10:35 PM
Exit mobile version