Maharashtra Weather : मुंबई, कोकणात पुढील 48 तासांत उकाडा वाढणार तर, विदर्भात मुसळधार; IMDचा इशारा

Maharashtra Weather : मुंबई, कोकणात पुढील 48 तासांत उकाडा वाढणार तर, विदर्भात मुसळधार; IMDचा इशारा

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सतत राज्यातील हवामानात बदल होत आहेत. राज्याच्या अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, काही भागांत उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. अशात, मुंबई आणि कोकणात पुढील 48 तासांमध्ये तापमानात आणखी वाढ होणार आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागू शकतो. तसेच, कोकण किनारपट्टीवरील भागातही उकाडा वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्याचप्रमाणे विदर्भ आणि मराठवाड्यावर मात्र गारपीट आणि अवकाळी पावसाचे सावट कायम असून, काही क्षेत्रांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशार वर्तवण्यात आला आहे. (maharashtra weather news vidarbha marathwada to experiance hailstorm and heavy rain)

हवामान विभागाच्या माहितीनुसार, अमरावती, वर्धा, नागपूर आणि यवतमाळ येथे गारपीट आणि ताशी 40 ते 50 किमी वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने येथील नागरिकांना शक्यतो घराबाहेर पडणे टाळण्याचे आवाहन केले आहे. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास राज्यातील बुलढाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट झाली. शेगाव खामगाव बुलढाणा तालुक्यासह आजूबाजूच्या परिसराला अवकाळी पावसाने अक्षरशः झोपडून काढले. परिणामी गारपीट अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने या भागात मोठे नुकसान झाल्यामुळे बळीराजा आणि सर्वसामान्य नागरिकांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो आहे.

याशिवाय, पुढील 24 तासांत राज्यातील दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, मुंबई शहर आणि उपनगरात आकाश मुख्यतः निरभ्र राहील. उपनगरात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

अवकाळी पावसामुळे 13 जनावरांचा मृत्यू 

या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. एकिकडे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असताना दुसरीकडे 13 जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्याभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


हेही वाचा – BMC: हॅण्डग्लोव्हज, ना हेल्मेट; नालेसफाई करताना कामगारांच्या आरोग्याला धोका

Edited By – Vaibhav Patil

First Published on: April 24, 2024 10:17 AM
Exit mobile version