मलिकांचा राजीनामा न स्वीकारण्याची राज्य सरकारची भूमिका, गांधी पुतळ्याजवळ महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आंदोलन

मलिकांचा राजीनामा न स्वीकारण्याची राज्य सरकारची भूमिका, गांधी पुतळ्याजवळ महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आंदोलन

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. मलिकांच्या अटकेविरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मंत्रालयाबाहेर महात्मा गांधीजींच्या पुतळ्यावर आंदोलन केलं जात आहे. तसेच नवाब मलिकांचा राजीनामा न स्वीकारण्याबाबत कालच चर्चा झाली होती. परंतु मलिकांचा राजीनामा न स्वीकारण्याची राज्य सरकारची भूमिका असल्याचं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

राजीनाम्याबाबत अद्यापही कोणताही निर्णय नाही

जितेंद्र आव्हाड यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, नवाब मलिकांचा राजीनामा न स्वीकारण्याबाबत कालच चर्चा झाली होती. परंतु मलिकांच्या राजीनाम्याबाबत अद्यापही आम्ही कोणताही निर्णय घेतलेला नाहीये. मात्र, आजच्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल आणि रणनिती ठरवली जाईल, असं आव्हाड म्हणाले.

महाराष्ट्राच्या राजकारणाला यशवंतराव चव्हाणांच्या राजकीय संस्कृतीचा स्पर्श होता. एखाद्या पक्षाचा विरोधी नेता गावात आजारी असेल तर त्याच्यासाठी हेलिकॉप्टर पाठवून मुंबईत उपचार करणे, हे सत्ताधारी आपलं कर्तृत्व समजायचे. येथे केंद्रातील सत्ताधारी विनाकारण हे कृत्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु नवाब मलिक मनी लाँड्रींग प्रकरण आणि दहशतवाद यामध्ये कुठेही दिसून येत नाहीये, असं आव्हाड म्हणाले.

मलिकांना देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, एकत्रितपणाने एखाद्याला बदनाम करण्याचा प्रयत्न चहूबाजूंनी केला जातोय. त्यामुळे लोकांच्या मनात एक संभ्रमाचं वातावरण निर्माण होतं. त्यामुळे अशा प्रकारची कृती करण्याचं काम हे त्यांच्याकडून चालू आहे. असं म्हणत आव्हाडांनी विरोधकांना टोला लगावला.

मलिकांवर अटकेचे संकेत किंवा कारवाई होताना दिसत आहे. हे दोन्हीकडून कुठेतरी थांबवं असं वाटतं नाही का?, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, आव्हाड म्हणाले की, कारवाई करा किंवा कारवाई करू नका हे सांगण्याचा माझा अधिकार नाही. परंतु मला जे काही दिसतंय हे सर्व भारताच्या राजकारणाची राजकीय पातळी हिमालायवरून खाली येताना दिसत आहे.

अतिरेक्यांचा आणि मलिकांचा यामध्ये काहीही संबंध नाही – छगन भुजबळ

१९९३ च्या बॉम्बस्फोटाचा आणि बॉम्बस्फोट करणाऱ्या अतिरेक्यांचा तसेच मलिकांचा यामध्ये काहीही संबंध नाही. परंतु कोणतीही मुस्लिम व्यक्ती असल्यानंतर त्याचं कनेक्शन दाऊदशी जोडायचं आणि त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय. ज्या ठिकाणी मलिकांची जागी आहे. तिथे त्यांचं छोटंस गोडाऊन आणि दुकान पूर्वीपासून होतं. परंतु ज्या वेळेस ते दुसऱ्या लोकांकडून विक्रीसाठी आलं तेव्हा त्यांनी ते विकत घेतलं होतं, असं अन्न व नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले.

भाजपचा खुलासा केल्यामुळे त्यांना अटक – धनंजय मुंडे

भाजपच्या विरोधात कोणीही बोलेल त्याला ईडी, सीबीआयची धमकी दिली जाते. नवाब मलिकांच्या बाबतीतही असेच झाले आहे. ते गेले अनेक दिवस भाजपचे पितळ उघडे करत होते त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

चुकीची आणि बेकायदेशीर कारवाई – कप्तान मलिक

चुकीची आणि बेकायदेशीर कारवाई आहे. ईडीला चौकशीआधी नोटीस बजावते. मात्र असे काहीही न करता पहाटे घरी येऊन कारवाई करतात हे चुकीचे आहे. ही लोकतंत्र्यांची हत्या करण्याचे काम केले आहे. नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डची कनेक्शन आहे की नाही हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने याविषयी मी काहीही बोलणार नाही अशी प्रतिक्रिया नवाब मलिकांचे भाऊ कप्तान मलिक यांनी म्हटले आहे.

नवाब मलिकांचं मंत्रिपद कायम राहणार – जयंत पाटील

नवाब मलिकांवर लावलेल्या आरोपांत काहाही तथ्य नाही. नेत्यांना टार्गेट करण्याचं काम सुरू असून मलिकांवर कारवाईचे राज्यभर पडसाद उमटणार आहेत. त्यामुळे राजीनामा देऊन त्यांच्या कृतीला प्रोस्ताहन देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. मलिक हे मंत्रिमंडळात कायम राहतील आणि त्यांच्याबाबत बैठक घेण्याचा विचार आम्ही केलेला नाहीये, असं जयंत पाटील म्हणाले.

मंत्र्याला चुकीच्या पद्धतीने अटक – दिलीप वळसे पाटील

सर्व जनतेचं लक्ष वेधून घेण्यासाठी चुकीच्या पद्धतीने संबंध ठेवून आणि दहशतवादाशी संबंध ठेवत एखाद्या मंत्र्याला चुकीच्या पद्धतीने अटक केली जाते. त्यावेळी त्याचा निषेध करणं आवश्यक आहे, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.

महाविकास आघाडीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न – बाळासाहेब थोरात

चुकीच्या पद्धतीने राज्य सरकार कधी वागत नाही. हे केंद्र सरकार आणि केंद्र सरकारच्या तपास यंत्रणांवर आधारीत आहे. तसेच महाविकास आघाडीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, असं महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.

केंद्र सरकारकडून सरकार पाडण्याचा प्रयत्न – अस्लम शेख

तुम्ही काल सर्व नेत्यांची प्रतिक्रिया पाहिली असेल. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. सरकार कशापद्धतीने पाडायचं आणि लोकांना त्रास कसा द्यायचा हे करण्याचं काम केंद्र सरकारकडून केलं जातंय, अशी प्रतिक्रिया मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.

आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो – मनिषा कायंदे 

महाविकास आघाडीचे सर्व नेते नवाब मलिकांसोबत आहेत. आज भराडी देवीची जत्रा असल्याने काही मंत्री जत्रेसाठी गेले आहेत. काल अचानक हा प्रकार झाल्याने नेत्यांची अनुपस्थितीती आहे. जे नेते मुंबईत आहेत ते येत आहेत. उत्तर प्रदेशच्या निवडणूकांसाठी देखील काही नेते आणि आमदार गेले आहेत. त्यामुळे देखील काही नेते आज येऊ शकलेले नाहीत. मात्र महाविकास आघाडी सरकारचे सगळे घटक एकत्र आहेत. आज जो अन्याय अत्याचार, दादागिरी सुरू आहे. ईडीचा ज्या प्रकारे वापर सुरू आहे त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी दिली आहे.

मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ उपोषणाला बसलेले महाविकास आघाडीचे नेते आणि मंत्र्यांची उपस्थिती खालीलप्रमाणे – 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, आरोग्य मंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार सुप्रियाताई सुळे, महिला प्रदेशाध्यक्षा व महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, नवाब मलिक यांची मुलगी निलोफर मलिक, नगरसेवक कप्तान मलिक, सलील देशमुख, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार, मंत्री अस्लम शेख, गृहराज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, मंत्री के. सी. पाडवी, लोकभारतीचे आमदार कपिल पाटील, कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप, प्रवक्ते सचिन सावंत, प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, माजी खासदार हुसेन दालवाई, माजी मंत्री नसीम खान, युवराज मोहिते, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, उद्योग मंत्री सुभाष देसाई, आमदार सुनील राऊत, आमदार मनिषा कायंदे, उपनेते सचिन अहिर, आमदार यामिनी जाधव, आमदार योगेश कदम, माजी आमदार विनोद घोसाळकर, आमदार शशिकांत शिंदे, आमदार अशोक पवार, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार संजय जगताप, आमदार संजय दौंड, आमदार चेतन तुपे, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार सुनिल अण्णा टिंगरे, आमदार कारेमोरे, आमदार चंद्रीकापुरे, भंडारा जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे, माजी आमदार हेमंत टकले,माजी आमदार प्रकाश गजभिये, माजी आमदार विद्या चव्हाण, माजी आमदार पंकज भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ,आमदार पोतनीस, राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, आमदार अमर राजोरकर,प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे आदींसह महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.


हेही वाचा : IPL 2022 : ऑस्ट्रेलियाच्या नव्या प्रशिक्षकांचं IPL वर मोठं वक्तव्य, म्हणाले


 

First Published on: February 24, 2022 10:59 AM
Exit mobile version