महाविकास आघाडी सरकारचा व्हॅटमध्ये कपात करण्यास नकार

महाविकास आघाडी सरकारचा व्हॅटमध्ये कपात करण्यास नकार

केंद्र सरकराने बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या अबकारी करात अनुक्रमे ५ रुपये आणि १० रुपयांची कपात केली. तसेच राज्य सरकारांनीही पेट्रोल, डिझेलच्या व्हॅटमध्ये कपात करावी, असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत भाजपशासित राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील वॅटमध्ये कपात केली आहे. मात्र, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार व्हॅटमध्ये कोणतीही कपात करणार नसल्याचे राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकारांना सांगितले आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीने शंभरी पार केल्यामुळे महागाई वाढली होती. तसेच त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसत होता. सर्वसामान्यांची होणारी कुचंबना आणि अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम लक्षात घेऊन बुधवारी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या अबकारी करात ५ आणि १० रुपयांची कपात केली. त्याचा परिणाम म्हणून मुंबईत पेट्रोल ६ रुपये तर डिझेल १२ रुपयांनी स्वस्त झाले.

डिलर्सचे कमिशन आणि राज्यांनी लावलेल्या व्हॅटमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जास्त आहेत. केंद्र सरकारने विविध राज्य सरकारांनी आपल्या राज्यात इंधनावर लावलेला व्हॅट कमी करण्याचे आवाहन राज्य सरकारांना केले होते. त्यानुसार, गुजरात, गोवा, उत्तर प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड, आसाम, मणीपूर, त्रिपुरा आणि बिहारमधील भाजपशासित सरकारांनी आपल्या राज्यात पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी केला. त्यामुळे या राज्यातील पेट्रोल आणि डिझेल अधिकच स्वस्त झाले.

मात्र, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करणार नाही. राज्यातील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकारांना ही माहिती दिली आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्याच्या विचारात सध्या तरी राज्य सरकार नाही, असे नवाब मलिक म्हणाले आहेत. राज्य सरकारने व्हॅट कमी केला तर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अधिक खाली येऊ शकतील. मात्र, सध्यातरी महाराष्ट्रातील जनतेला कोणताही दिलासा नाही.

First Published on: November 5, 2021 6:20 AM
Exit mobile version