महाविकास आघाडीचा १७ डिसेंबरला महामोर्चा

महाविकास आघाडीचा १७ डिसेंबरला महामोर्चा

मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच भाजपच्या अन्य नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज तसेच राज्याच्या इतर मानबिंदूंवर करण्यात आलेली अवमानकारक वक्तव्ये, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे महाराष्ट्रद्रोही विधान आणि
कर्नाटकविरोधात राज्य सरकारने घेतलेली नेभळट भूमिका, राज्यातील उद्योगधंदे गुजरातमध्ये नेण्याचे कट कारस्थान तसेच वाढती बेरोजगारी आणि महागाईच्या प्रश्नावर राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे येत्या १७ डिसेंबरला सकाळी ११ वाजता मुंबईत जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा अतिविराट महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार तसेच काँग्रेस विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. हा मोर्चाचा पहिला टप्पा आहे. यानंतरही सरकार ऐकणार नसेल तर टप्प्याटप्प्याने आंदोलन केले जाईल, असा इशारा महाविकास आघाडीने दिला आहे.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला येत्या १९ डिसेंबारपासून नागपूर येथे सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. राज्यातील सत्तांतरानंतर सरकारविरोधात रणनीती ठरविण्यासाठी प्रथमच आघाडीचे सर्व नेते एकत्र आले. या बैठकीत गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटना लक्षात घेऊन सरकारविरोधात रणशिंग फुंकून विरोधी पक्षांची एकजूट दाखविण्याचा निर्धार करण्यात आला. त्यानुसार अधिवेशनाच्या दोन दिवस अगोदर मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या आंदोलनाला अंतिम स्वरूप देण्यासाठी ८ डिसेंबरला महाविकास आघाडी तसेच अन्य मित्रपक्षांची बैठक होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

राज्यपाल म्हणून कोणालाही पाठविण्यात येते. हेच राज्यपाल आपल्या आदर्शांचा अवमान करीत असल्याचे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले की, हे राज्यपाल महाराष्ट्राच्या अस्मितेवर तर आघात करीतच आहेत, पण मुंबई, महाराष्ट्राबद्दल विधाने करून हिंदूंमध्येही फूट पाडत आहेत. त्यांना महाराष्ट्राचा स्वाभिमान छिन्नविच्छिन्न करायचा आहे. गुजरातची निवडणूक जिंकण्यासाठी आधी उद्योग गुजरातला पळविण्यात आले. आता कर्नाटकच्या निवडणुकीसाठी गावे तोडण्याचा प्रकार सुरू आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी इशारा दिल्यानंतर महाराष्ट्राचे मंत्री आपला दौरा रद्द करीत आहेत. इतके नेभळट सरकार कधी पाहिले नाही. सरकार नेभळट आहे, पण महाराष्ट्र नेभळट नाही. आमच्या आदर्शांचा अपमान सहन करणार नाही. महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा लढा देण्यासाठी आणि हा महाराष्ट्र शूरवीरांचा आहे हे दाखवून देण्यासाठी येत्या १७ डिसेंबर रोजी जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा अतिविराट मोर्चा काढण्यात येणार आहे. या महाराष्ट्राला मुख्यमंत्री आहेत हे कधी कळणार, असा सवाल करताना हा मोर्चा केवळ राजकीय अथवा एकट्या महाविकास आघाडीचा नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या अवमानामुळे ज्यांचे रक्त उसळले आहे, अशा सर्वांनी मोर्चात सहभागी व्हावे, अशी विनंतीही ठाकरे यांनी केली.

राज्यपाल बदलले तरी मोर्चा निघणारच : अजित पवार

या महामोर्चात महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्ष तर सहभागी होणारच आहेत, पण शेकाप, समाजवादी, कम्युनिस्ट पक्ष आदी सर्व मित्रपक्षही सहभागी होणार असल्याचे सांगून अजित पवार म्हणाले की, राज्यपालांची छत्रपतींबाबतची बेताल वक्तव्ये पाहता त्यांना बाजूला करावेच लागेल, पण १७ तारखेच्या आत राज्यपालांना हटविले तरीही हा मोर्चा निघणारच आहे. आघाडी सरकार होते तेव्हा देगलूर, जतमधील गावांनी कधी वेगळे होण्याची भाषा केली नाही, पण या सरकारने आम्ही केलेली आर्थिक तरतूद थांबवली, विकासकामांना स्थगिती दिली. त्यामुळेच जनतेत असंतोष निर्माण झाला आहे. जात तालुक्यातील गावांचे लोण आता सर्वच सीमा भागातील गावांपर्यंत पोहचले आहे. आघाडीचे सरकार असताना हा प्रश्न कधीच निर्माण झाला नव्हता याकडेही पवार यांनी लक्ष वेधले. यासोबतच महागाई आहे बेरोजगारीचाही मुद्दा आहे. राज्यात आलेले उद्योग यांनी घालवले. आता यांचे नको ते उद्योग सुरू आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री वेगवेगळी वक्तव्ये करीत आहेत. आपल्याच मंत्र्यांना कर्नाटकात जायला बंदी आहे. हे सहन तरी कसे करतात. कर्नाटकात जाऊ असे म्हणणार्‍या मंत्र्यांनी पळपुटेपणा दाखवला. यांच्यात कोणतीही धमक नाही, अशी टीका करताना विरोधी पक्षातील नेते वेशभूषा करून बेळगावला गेले होते याची आठवण अजित पवार यांनी करून दिली. महाराष्ट्र कधी कोणासमोर झुकला नाही आणि झुकणार नाही, असेही अजित पवार यांनी बजावले.

मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर द्यायला हवे : बाळासाहेब थोरात

राज्यात हे सरकार आल्यानंतर सातत्याने महाराष्ट्राची अवहेलना होत आहे. राज्यपालांपासून ते विविध नेत्यांपर्यंत जी वक्तव्ये होत आहेत ती मनाला वेदना देणारी आहेत. महाराष्ट्राच्या मानबिंदूंची अवहेलना सुरू आहे. राज्यातील जनतेच्या मनात यामुळे प्रचंड असंतोष आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राला हानिकारक वक्तव्ये करतात, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्याला साधे उत्तरही देत नाहीत. वास्तविक पाहता त्यांनी याला तगडे उत्तर दिले पाहिजे. महागाई प्रचंड वाढली आहे. उद्योग गुजरातकडे जात आहेत आणि सरकार हे उघड्या डोळ्यांनी पाहत आहे, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली.
यावेळी काँग्रेसचे अशोक चव्हाण, भाई जगताप, राष्ट्रवादीचे छगन भुजबळ, जयंत पाटील, शिवसेनेचे संजय राऊत, आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर आदी उपस्थित होते.

First Published on: December 6, 2022 5:15 AM
Exit mobile version