पोलीस विभागात मोठे फेरबदल, नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडेंची बदली

पोलीस विभागात मोठे फेरबदल, नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडेंची बदली

मुंबईः राज्यातील पोलीस विभागात पुन्हा एकदा मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची बदली करण्यात आली असून, त्यांना राज्यातील महिला अत्याचार प्रतिबंधक विभागात विशेष पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्ती देण्यात आली आहे. जयंत नाईकनवरे नाशिकचे नवे पोलीस आयुक्त करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचीसुद्धा बदली करण्यात आली असून, त्यांना राज्याच्या व्हीआयपी सुरक्षा विभागात विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्त केलेय. तसेच राज्य सुधार सेवेतील विशेष पोलीस महानिरीक्षक असलेल्या अंकुश शिंदे यांना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदी नियुक्त केले आहे. महसूल विभागासंदर्भात वादग्रस्त पत्र लिहिल्याप्रकरणी दीपक पांडे चर्चेत आले होते. त्या प्रकरणात दीपक पांडेंना गृह विभागाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यामुळे वाद आणि दीपक पांडे हे समीकरणच बनले होते. काही दिवसांपूर्वी पांडे यांनी बदलीसाठी  विनंती अर्ज केला होता.

नाशिकमध्ये हेल्मेट सक्ती, भोंग्यांवर मनाई आदेश, महसूल खात्यातील लेटरबॉम्ब, बॅनर परवानगी बंधनकारक, मिरवणूक परवानगी आवश्यक असे अनेक निर्णय बेधडकपणे घेत त्यांची अंमलबजावणी केल्यामुळे ते चर्चेत आलेत. विशेष म्हणजे त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरही कारवाई केली होती, भोंग्याबाबतही त्यांनी मनाई आदेश काढले होते. तसेच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडे असलेले अधिकार आरडीएक्स आणि डीटोनेटरसारखे आहेत. त्यामधून एक जिवंत बॉम्ब तयार होत असून तो भूमाफियांच्या मर्जीप्रमाणे वागतो. हे भूमाफिया महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून सर्वसामान्य नागरिकांचा छळ करून वित्तीय आणि जिवीतास धोका निर्माण करत आहेत, असा गंभीर आरोप पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी केला होता.

First Published on: April 20, 2022 8:57 PM
Exit mobile version