Mann Ki Baat : गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी धडपडणाऱ्या नाशिकच्या चंद्रकिशोर यांचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक

Mann Ki Baat : गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी धडपडणाऱ्या नाशिकच्या चंद्रकिशोर यांचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक

गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी धडपडणाऱ्या नाशिकच्या चंद्रकिशोर यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ८७ व्या ‘मन की बात’ (Mann Ki Baat) कार्यक्रमात कौतुक केलं. महाराष्ट्रात नाशिक इथे एक स्वछाग्रही आहेत चंद्रकिशोर. त्यांनी गोदावरी नदी स्वच्छतेचा संकल्प केला आहे. ते गोदावरी नदीजवळ उभे राहून लोकांना नदीत घाण, कचरा न टाकण्याची विनंती करत असतात. त्यांचे हे प्रयत्न, जनजागृती करण्याबरोबर प्रेरणाही देतात, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले?

आरोग्याचा थेट संबंध स्वच्छतेशी देखील आहे. ‘मन की बात’ मध्ये आपण नेहमी स्वच्छाग्रहींच्या प्रयत्नांविषयी नेहमीच बोलतो. असेच एक स्वछाग्रही आहेत चंद्रकिशोर पाटील. हे महाराष्ट्रात नाशिक इथे राहतात. चंद्रकिशोरजी यांनी स्वच्छतेचा फार मोठा संकल्प सोडला आहे. ते गोदावरी नदीजवळ उभे राहतात, आणि लोकांना नदीत घाण, कचरा न टाकण्याची विनंती करत असतात. जर कुणी असं करताना दिसला तर ते लगेच जाऊन त्याला थांबवतात. या कामात चंद्रकिशोर जी आपला खूप वेळ खर्च करतात. संध्याकाळ पर्यंत त्यांच्याकडे अशा गोष्टींचा ढीग जमा होतो, ज्या लोक नदीत फेकायला घेऊन आलेले असतात. चंद्रकिशोरजी यांचे हे प्रयत्न, जनजागृती देखील करतात आणि प्रेरणा देखील देतात. याच प्रमाणे आणखी एक स्वछाग्रही आहेत – ओडिशातील पुरीचे राहुल महाराणा. राहुल दर रविवारी सकाळी सकाळी पुरीच्या तीर्थस्थळांजवळ जातात, आणि तिथे प्लास्टिकचा कचरा साफ करतात. त्यांनी आतापर्यंत शेकडो किलो प्लास्टिक कचरा आणि घाण साफ केली आहे. पुरीचे राहुल असोत किंवा नाशिकचे चंद्रकिशोर, हे आपल्याला फार मोठी शिकवण देतात. नागरिक म्हणून आपण आपले कर्तव्य पार पडले पाहिजे, स्वच्छता असो, पोषण असो, किंवा मग लसीकरण, या सगळ्या प्रयत्नांनी देखील निरोगी राहायला मदत होते, असे मोदी म्हणाले.

एप्रिल महिन्यामध्ये आपण दोन महान विभूतींची जयंती साजरी करणार आहोत. या दोघांनीही भारतीय समाजावर आपला अमिट ठसा उमटवला आहे. या महान विभूती आहेत – महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर! महात्मा फुले यांची जयंती 11 एप्रिल रोजी आहे आणि बाबासाहेबांची जयंती आपण १४ एप्रिलला साजरा करणार आहोत. या दोन्ही महापुरूषांनी भेदभाव, असमानता यांच्या विरोधात खूप मोठा लढा दिला. महात्मा फुले यांनी त्या काळामध्ये मुलींसाठी शाळा सुरू केल्या. बालिका हत्येच्याविरोधात आवाज उठवला. जल संकटातून मुक्ती मिळावी, यासाठीही त्यांनी मोठं अभियान चालविलं.

महात्मा फुले यांच्याविषयी बोलताना सावित्रीबाई फुले यांचा उल्लेख करणं, तितकंच जरूरीचं आहे. सावित्रीबाई फुले यांनी अनेक सामाजिक संस्था स्थापन करण्यामध्‍ये मोठी भूमिका पार पाडली. एक शिक्षिका आणि एक समाज सुधारक या रूपानं त्यांनी समाजाला जागरूकही केलं आणि सर्वांना प्रोत्साहनही दिले. दोघांनी मिळून सत्यशोधक समाजाची स्थापना केली. लोकांच्या सशक्तीकरणाचे प्रयत्न केले. आपल्याला बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामध्येही महात्मा फुले यांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. ते म्हणायचे की, कोणत्याही समाजाच्या विकासाचे आकलन त्या समाजातल्या महिलांची स्थिती पाहून करता येते. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यातून प्रेरणा घेवून, सर्व माता-पिता आणि पालकांना सांगू इच्छितो की, त्यांनी आपल्या मुलींना जरूर शिकवावे. मुलींनी जास्तीत जास्त संख्येने शाळेत यावे म्हणून काही दिवसांपूर्वीच कन्या शिक्षण प्रवेश उत्सवही सुरू केला आहे. ज्या मुलींचे शिक्षण काही कारणामुळे थांबलं असेल, राहिलं असेल तर त्यांना पुन्हा एकदा शाळेत आणण्यावर भर दिला जात आहे.

बाबासाहेब यांच्याशी संबंधित पंचतीर्थाचं कार्य करण्याची आपल्याला संधी मिळाली, ही आपल्या सर्वांसाठी सौभाग्याची गोष्ट आहे. त्यांचे जन्मस्थान -महू असो, मुंबईची चैत्यभूमी असो, अथवा दिल्ली मध्ये बाबासाहेबांच्या महा-परिनिर्वाणाचे स्थान, मला या सर्व स्थानांवर, सर्व तीर्थांवर जाण्याचं भाग्य लाभलं. ‘मन की बात’ च्या श्रोत्यांना मी आग्रह करतो की, त्यांनी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित असलेल्या सर्व स्थानांचे दर्शन जरूर करावं. त्यामधून आपल्याला खूप काही शिकायला मिळेल.

 

First Published on: March 27, 2022 2:12 PM
Exit mobile version