Manoj Jarange : मराठा आरक्षण विरोधकांना पाडा, जरांगेंचे समाजाला आवाहन

Manoj Jarange : मराठा आरक्षण विरोधकांना पाडा, जरांगेंचे समाजाला आवाहन

Manoj Jarange : मराठा आरक्षण विरोधकांना पाडा, जरांगेंचे समाजाला आवाहन

जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कारखाना परिसरातील मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला. गेल्या काही दिवसांपासून जरांगे यांची प्रकृती ठीक नसल्याने ते छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल आहेत. परंतु, उपचार सुरू असतानाही त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. जरांगे यांनी अॅम्ब्युलन्समधून येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या उमेदवारांना पाडा, असे आवाहन मराठा समाजाच्या मतदारांना केले आहे. (Manoj Jarange appeal to demolish opponents who oppose Maratha reservation)

प्रसार माध्यमांसमोर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मी सांगितले होते कोणालाही मतदान करा, समाजाच्या खांद्यावर जबाबदारी आहे. सगेसोयरेच्या बाजूने आणि मराठा आणि कुणबी एकच या बाजूने असणाऱ्यांना मात्र सहकार्य समाजाने करावे. जरी आपण उमेदवार दिलेला नाही, पाठिंबाही दिला नाही. पण पाडण्यातही आपला विजय आहे. यावेळेस पाडणारे बना. उभेच राहावे किंवा उमेदवार द्यावा असे काही नाही, पाडण्यातही खूप मोठा विजय आहे. यावेळेस पाडणारे बना. जर सहा जूनच्या आत आरक्षण दिले नाही तर देणारे बनू, आपण विधानसभेला मैदानात मी सुद्धा असेन. कारण मराठा, मुस्लिम, धनगर बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे, असेही यावेळी जरांगे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा… Lok Sabha 2024 : आवाहन करूनही मतदानाची टक्केवारी वाढेना, नेत्यांना चिंता

तर, बारा बलुतेदार दलित बांधव सगळ्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे आपण देणारे बनू. उगाच काहीही अफवा पसरवल्या जात आहेत, महायुती आणि महाविकास आघाडी दोघे सारखेच आहेत हे म्हणण्याचा माझा अर्थ होता, या दोघांनी मिळून आमचा करेक्ट कार्यक्रम केला आहे, दोघांनी लेकरांचे वाटोळे केले, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. आपला उमेदवार नसल्यामुळे, तुम्ही मतदान कोणालाही करा, पण जे सगेसोयरे आणि मराठा आरक्षणाच्या बाजूने असेल त्याला करा. इतक्या ताकदीने विरोधकाला पाडा की त्या उमेदवाराच्या कमीत कमी पाच पिढ्या निवडणुकीला उभ्या राहिल्या नाही पाहिजेत. मराठ्यांनी एकजूट दाखवा, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे.

288 पैकी 92-93 मतदारसंघ असे आहेत जिथे मराठ्यांचे वर्चस्व आहे. माझा राजकीय मार्ग नाही, मला तिकडे जायचे नाही, पण मला तुम्ही तिकडे न्यायचा प्रयत्न करत आहात, तर माझा नाईलाज आहे. मराठा समाजासह लिंगायत समाज सर्व एकत्र येऊ. प्रश्न गोरगरिबांचा आहे, आम्हाला देणारे बनावे लागेल, असा इशाराच यावेळी मनोज जरांगे यांनी दिला आहे. त्यामुळे 4 जूनच्या निकालात नेमके किती मराठा उमेदवारांचा पराभव होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा… Lok Sabha 2024 : परभणीतील बलसा खुर्द गावाचा मतदानावर बहिष्कार; अतिक्रमणामुळे मतदार नाराज


Edited By : Poonam Khadtale

First Published on: April 26, 2024 1:02 PM
Exit mobile version