समृद्धी महामार्ग होऊ नये म्हणून अनेक प्रयत्न झाले पण…, मुख्यमंत्र्यांचे ठाकरे गटावर शरसंधान

समृद्धी महामार्ग होऊ नये म्हणून अनेक प्रयत्न झाले पण…, मुख्यमंत्र्यांचे ठाकरे गटावर शरसंधान

नागपूर : समृद्धी महामार्गाला विशेष प्रकल्पाचा दर्जा दिला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर भूसंपादन करण्याचे आव्हान होते. हा प्रकल्प होऊ नये अनेक प्रयत्न झाले. पण आम्ही भूसंपादन नियोजित वेळेच्या आत पूर्ण केले, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता शरसंधान केले.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 31 ऑगस्ट 2015 रोजी विधानसभेत या महामार्गाची घोषणा केली होती. त्यानंतर तत्कालीन सार्वजनिका बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यामुळे या महामार्गाच्या लोकर्पणाचा हा क्षण माझ्यासाठी स्वप्नपूर्ती आणि आनंदाचा असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आपण या महामार्गाचे काम सुरू केले आणि त्याच्या लोकार्पण सोहळ्यास आम्ही एकत्र आहोत, असे सांगून एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही दोघांनी सगळ्यांना एकत्र घेऊन काम केले. हा असा प्रकल्प आहे की, सुरुवातीपासूनच या प्रकल्पाशी संबंधित सर्वच एकत्र आहोत. भूसंपादन करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प पूर्ण केला. जमीन अधिग्रहण निर्धारित वेळे आधीच पूर्ण केले.

हा प्रकल्प उभारताना विविध अडचणी आल्या. या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी अनेक बैठका झाल्या. काही टप्प्यांवर जमीन अधिग्रहणाला विरोध झाला. काही ठिकाणी विरोध करायला लावला गेला. हा प्रकल्प होऊ नये म्हणून प्रयत्न झाले. जमीन दिल्या जाऊ नये म्हणून बैठका झाल्या, असे सांगत मुख्यंत्र्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

आता समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी असा पहिला पहिला टप्पा सुरू केला आहे. पुढील दहा महिन्यात हा महामार्ग मुंबईपर्यंत पोहोचेल. हा पर्यावरणस्नेही महामार्ग असून या रस्त्यालगत 11 लाखांहून अधिक झाडे आणि जवळपास 22 लाखांहून अधिक झुडुपे व वेलींचे रोपण करण्याचे नियोजन आहे. शेतकऱ्यांसाठी 1200हून अधिक तलाव बांधले आहेत. शिवाय, 138.47 मेगावॅट सौर ऊर्जा तयार केली जाईल, असे शिंदे म्हणाले.

First Published on: December 11, 2022 1:56 PM
Exit mobile version