संचारबंदीचा आदेश झुगारून सोलापुरात मराठा आक्रोश मोर्चा

संचारबंदीचा आदेश झुगारून सोलापुरात मराठा आक्रोश मोर्चा

आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मराठा समाजाला रद्द झालेले आरक्षण पुन्हा मिळावे, या प्रमुख मागणीसाठी माजी आमदार नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली रविवारी संचारबंदीचा आदेश झुगारून सोलापुरात मराठा आक्रोश मोर्चा निघाला. सोलापूर पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली होती तरीसुद्धा संयोजक मोर्चा काढण्यावर ठाम राहिल्यामुळे पोलिसांची मोठी पंचायत झाली. सोलापूर आणि जिल्हाभरातून हजारो मराठा आंदोलक सोलापुरात येणार असल्याने मोर्चाला नेमके कसे रोखायचा असा प्रश्न पोलिसांसमोर होता. त्यासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आणि पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी शहर आणि ग्रामीण भागात ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला होता. सोलापूर शहराकडे येणार्‍या प्रत्येक मार्गावर पोलीस बंदोबस्त लावल्याने आंदोलकांना सोलापूर शहरात येता आले नाही.

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे भाजप आमदार समाधान आवताडे, बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत, विधानपरिषदेचे भाजप आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील आणि अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधीना ग्रामीण भागातच पोलिसांनी अडविले. त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा होता. मात्र, आमदारांना अडविल्याचे समजताच माजी आमदार नरेंद्र पाटील संतापले आणि जोपर्यंत अडकून पडलेले आमदार सोलापूर शहरात येत नाहीत तोपर्यंत मोर्चा जागेवरून निघणार नाही, असा आक्रमक पवित्र घेतला. त्यामुळे तणावाची परिस्थिती ओळखत पोलिसांनी आमदारांना सोलापुरात येण्यास परवानगी दिली आणि आमदार सोलापुरात मोर्चासाठी पोहोचले. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख हे सांगोलावरून निघाले खरे. मात्र, पोलीस त्यांना ताब्यात घेतील म्हणून त्यांनी आजाराचे नाटक करत तोंडाला कापड गुंडाळून व हाताला सलाईन लावून अ‍ॅम्ब्युलन्समधून पोलिसांना चकवा देत सोलापूर गाठले आणि ते मोर्चाच्या ठिकाणी पोहोचले. छत्रपती संभाजी महाराज चौकातून सकाळी ११ वाजता निघणारा मोर्चा पोलिसांच्या दडपशाहीमुळे दुपारी दीड वाजता निघाला. गर्दीचे कारण पुढे करून पोलिसांनी मराठा आक्रोश मोर्चाला परवानगी नाकारली होती. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यापासून निघालेल्या या मोर्चाचा समारोप छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ झाला. मोर्चाच्या सर्वात समोर आणि दोन्ही बाजूला ११० पोलीस अधिकारी,१२०० पोलीस अंमलदार,५०० होमगार्ड जवान तसेच एसआरपीच्या तीन तुकड्या यासह शहर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता.

बॅरिकेड्स लावून पोलिसांकडून रस्ते बंद

सोलापूर शहरात येणार्‍या प्रत्येक रस्त्यावरती शहर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हैदराबाद रोड, विजापूर नाका, तुळजापूर नाका, जुना पुना नाका, देगाव नाका, होटगी नाका या ठिकाणी पोलीस मोठ्या प्रमाणावर बंदोबस्तासाठी नियुक्त केले होते. सकाळी ११ वाजता हा मोर्चा निघणार होता, तत्पूर्वी ग्रामीण पोलिसांनीही तालुक्याच्या ठिकाणाहून निघणार्‍या आंदोलकांना त्याच ठिकाणी अडवले. दरम्यान सोलापूर शहरात आंदोलनाचा जो मार्ग होता तो मार्ग वगळता अन्य मार्गांवर बॅरिकेड्स लावून संपूर्ण मार्ग बंद करून टाकण्यात आले होते.

लोकप्रतिनिधीचा रस्त्यावरच ठिय्या

मराठा आक्रोश मोर्चासाठी आमदार समाधान आवताडे, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार राजेंद्र राऊत यांच्यासह आदी लोकप्रतिनिधी सोलापूर शहराच्या दिशेने निघाले होते. त्यांच्यासोबत मराठा समाजातील तरुणांचाही मोठा फौजफाटा होता. त्यांना पोलिसांनी अडवल्यानंतर या लोकप्रतिनिधींनी त्याच ठिकाणी रस्त्यांवर ठिय्या आंदोलन केले. पोलीस अधिकार्‍यांच्या सांगण्यावरून त्यांना पुन्हा सोलापूर शहराकडे येण्यास परवानगी देण्यात आली.

First Published on: July 4, 2021 11:45 PM
Exit mobile version