रोहन तोडकरच्या कुटुंबाला मराठा समाजाकडून आर्थिक मदत

रोहन तोडकरच्या कुटुंबाला मराठा समाजाकडून आर्थिक मदत

रोहन तोडकर या तरुणाचा मराठा आरक्षण आंदोलनात बळी

कोपरखैरणे येथे २५ जुलै रोजी झालेल्या आंदोलनात मराठा समाजाच्या रोहन तोडकर या युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली. रोहन हा कुटुंबातील एकुलता एक कमावता मुलगा तोडकर कुटुंबीयांनी गमावला. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्यांच्या कुटूंबाना शासनातर्फे अनेक आश्वासने देण्यात आली होती. मात्र त्याची पूर्तता करण्यात आली नाही. याबाबत आझाद मैदान येथे उपोषण सुरू आहे. यात नवी मुंबईत मृत्युमुखी पडलेल्या रोहनचे वडील उपस्थित होते. त्यांना नवी मुंबई मराठा समाजाच्यावतीने आर्थिक मदत देण्यात आली आहे.

नवी मुंबईत मृत्युमुखी पडलेल्या रोहन तोडकरचा मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबियांनी नकार दिला होता. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आर्थिक नुकसान भरपाई आणि कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्याचे लेखी आश्वासन तोडकर कुटुंबियांना दिले होते. या घटनेला तीन महिने पूर्ण होत आले तरी शासनाकडून कुठलीही मदत पीडित कुटुंबाला मिळाली नाही. हीच अवस्था महाराष्ट्रात ज्या ज्या बांधवांनी आत्महत्या केली आहे, त्यांच्या कुटुंबीयांची आहे. म्हणूनच यांना न्याय मिळवून देण्यासाठी २ नोव्हेंबरपासून आझाद मैदान येथे बेमूदत उपोषणाला सुरु करण्यात आले आहे.

या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी रोहन तोडकरचे वडील आज उपस्थित राहिले होते. रोहन तोडकरला न्याय मिळावा तसेच सरकारने जाहीर केलेली आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी मिळावी म्हणून त्यांनी थेट आझाद मैदान गाठले. कुटुंबियांना एक आधार म्हणून मराठा हेल्पलाईन, मराठा क्रांती मोर्चा, नवी मुंबईच्या वतीने तोडकर कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात आली. तसेच समाजाच्या वतीने सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले.

First Published on: November 7, 2018 7:25 PM
Exit mobile version