चेंबूर येथे मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण

चेंबूर येथे मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण

मराठा संघटनांचे रस्तारोको

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या ठोक आंदोलनाने आता उग्र रूप धारण केले आहे. याचे पडसाद आज मुंबईमध्ये देखील उमटले. खरतरं मुंबईमध्ये उद्या बंदची हाक देण्यात आली असताना आज मुंबईच्या चेंबूर येथे मराठा संघटना आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. चेंबूर कॅम्प येथे मराठा संघटनांनी रास्तारोको करत आंदोलन केले. यावेळी आंदोलन कर्त्यांनी रस्त्यावर उतरत जोरदार घोषणाबाजी केली.

म्हणून मराठा आंदोलन चिघळले

औरंगाबाद जवळील कायगाव टोका येथे पुलावरून नदीमध्ये उडी मारल्याने दत्तात्रय शिंदे या तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला असून, आजपासून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असल्याने परिस्थिती आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे. मात्र मुंबईमध्ये बुधवारी बंद राहिल असे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रवींद्र पवार यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

संतप्त झालेल्या आंदोलकांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यासंदर्भात औरंगाबादमध्ये मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांची बैठक देखील झाली आहे. या बैठकीमध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

शिंदे कुटुंबियांच्या मागण्या

काका शिंदे याच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियाने काही मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी काका शिंदे यांना शहीद घोषित करुन त्यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांची भरपाई देण्यात यावी. हा निर्णय येईपर्यंत मेगाभारती रोखावी आणि स्थानिक अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

काका शिंदे यांविषयी…

काका दत्तात्रय शिंदे हे औरंगाबादमधील गंगापूर तालुक्यातील कायगाव गावचे रहिवाशी होते. त्यांचे दहावी पर्यंत शिक्षण झाले होते. ते औरंगाबादमधील मराठा मोर्चापूर्वी प्रत्येक मराठा मोर्चात सहभागी व्हायचे. औरंगाबादमध्ये एक एकर शेतीवरच त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. लहान भाऊ अविनाश शिंदेंचे अद्याप शिक्षण सुरु आहे. तर काका हे घरातील एकमेव नोकरी करणारे होते. युवासेना जिल्हाध्यक्ष संतोष माने यांच्या गाडीवर काका हे ड्रायव्हर म्हणून कार्यरत होते.

First Published on: July 24, 2018 1:38 PM
Exit mobile version