आंदोलन करू नका, सरकार न्याय मिळवून देण्यास वचनबद्ध : मुख्यमंत्री

आंदोलन करू नका, सरकार न्याय मिळवून देण्यास वचनबद्ध : मुख्यमंत्री

मराठा बंधु-भगिनींनो, तुमची बाजू सरकार आक्रमकपणे मांडत आहे, ज्येष्ठ विधीज्ञांसोबत चर्चा करत आहोत. तुम्ही आंदोलने जरूर करा परंतु कोणाच्या विरोधात? सरकार तर तुमच्यासोबतच आहे. आंदोलनांची आवश्यकता नाही कारण तुम्हाला न्याय मिळवून देण्यास सरकार वचनबद्ध आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना कोरोना, शेती, मराठा आरक्षण, राजकारण अशा विविध मुद्यांवर भाष्य केले.

मराठा आरक्षणाचा निर्णय झाला तेव्हा शिवसेना-भाजपचे सरकार सत्तेत होते, तर काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधात होते. मात्र, विधिमंडळातील सर्व पक्षांनी मराठा आरक्षणासाठी बहुमताने नाही, तर एकमताने निर्णय घेतला. त्याच्या विरोधात उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले, ते आव्हान आपण जिंकलो, सर्वोच्च न्यायालयात लढाई सुरू आहेत; पण पहिल्या सरकारचे वकील आपण बदललेले नाहीत, उलट नवे वकीलही नियुक्त केले, ज्या-ज्या सूचना मिळत गेल्या त्यांचे पालन केले. राज्य सरकार म्हणून आपण कोर्टात कमी पडलो नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मोठ्या खंडपीठासमोर मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडण्याची राज्य सरकारची मागणी सर्वोच्च न्यायालयाने मानली; पण ते करताना अनाकलनीय पद्धतीने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी अंतरिम स्थगिती दिली. इतर राज्यात तशी स्थगिती दिल्याचे माझ्या माहितीत नाही; पण गरज नव्हती ती स्थगिती दिली, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

आता कोणासमोर काय आणि कशा पद्धतीने गार्‍हाणं मांडायचे याचा आम्ही अभ्यास करत आहोत, विरोधी पक्ष नेत्यांशी मी फोनवर बोललो, ते सध्या बिहारला आहेत; पण त्यांनीही आपण सोबत असल्याची हमी दिली. इथे राजकारण हा मुद्दा नाही. त्यामुळे मराठा बांधवांनो, तुमच्या आणि आमच्या भावना वेगळ्या नाहीत. आंदोलन जरुर करा, पण केव्हा? सरकार दाद देत नसेल तर आंदोलन करा, विनाकारण उद्रेक कशासाठी करता? आपण एकत्र आहोत, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे-पाटील असे मंत्रिमंडळातील अनेक मंत्री त्यासाठी प्रयत्न करत आहेत. कोरोनाच्या संकटात आंदोलन करू नका, तुम्हाला न्याय देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. गैरसमज पसरवू नका, एकजुटीने न्याय मिळवून देऊ, अशी हमी उद्धव ठाकरे यांनी मराठा बांधवांना दिली.

मास्क काढून उत्तरे देणार

तूर्त मी राजकारणाविषयी बोलणार नाही. मात्र, महाराष्ट्राच्या बदनामीचा जो काही डाव आखला जात आहे त्याविषयी मी एकदा मुख्यमंत्रीपदाचा मास्क थोडावेळ बाजूला काढून जरुर बोलणार आहे. मी बोलत नाही याचा अर्थ माझ्याकडे उत्तरे नाहीत असे नाही; पण मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलेलो आहे. त्याला अनुसरुन काम करावे लागते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात जाऊन आलोय

मुख्यमंत्री घरात बसून काम करतात. घराबाहेर पडत नाहीत, असा विरोधक माझ्यावर आरोप करत आहेत. पण मी व्हिडिओच्या माध्यमातून खेड्यापाड्यात, महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात जाऊन आलो आहे. त्या लोकांशी बोलणे गरजेच आहे. ते काम मी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करत आहे आणि काम होत आहे. आरोप करून काहीही फायदा नाही. आरोप करणारे जिथे गेले नाहीत अशा दुर्गम भागात मी जाऊन आलो आहे. तिथल्या अधिकार्‍यांशी संवाद साधून त्यांना सूचनाही केल्या आहेत. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या गोष्टी मी पार पाडल्या आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

कोरोनाचे चित्र भीतीदायक

कोरोनाचे भीतीदायक चित्र आहे. ग्रामीण भागात आता कोरोना वाढत चालला आहे. दुसरी लाट आली की काय अशी भीती आहे. हे संकट वाढत आहे. त्यामुळे आपल्याला खबरदारी घ्यावी लागेल. आधी मी बोललो होतो ‘तुम्ही खबरदारी घ्या, मी जबाबदारी घेतो’ पण आता मी तुमच्यावरही जबाबदारी टाकत आहे. आपण आपल्या परिवाराची जबाबदारी घ्यायची आहे. ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ ही योजना सुरू करत आहोत. कोरोनावर मात करण्यासाठी ही नवी मोहीम असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

First Published on: September 13, 2020 11:55 PM
Exit mobile version