मराठा आरक्षण : उद्यापासून मूक आंदोलनाला प्रारंभ; कोरोनाच्या नियमांचं पालन करा, संभाजीराजेंचं आवाहन

मराठा आरक्षण : उद्यापासून मूक आंदोलनाला प्रारंभ; कोरोनाच्या नियमांचं पालन करा, संभाजीराजेंचं आवाहन

मराठा आरक्षणावरुन खासदार संभाजीराजे आक्रमक झाले असून त्यांनी ६ जून रोजी राजसदरेवरुन आंदोलनाची हाक दिली होती. १६ जूनला कोल्हापुरातून मूक आंदोलनाची सुरुवात होईल अशी घोषणा संभाजीराजे यांनी केली होती. उद्यापासून होणाऱ्या मूक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाची भूमिका आणि दिशा संभाजीराजे यांनी आज स्पष्ट केली आहे. आज त्यांनी कोल्हापुरात त्यांच्या समर्थकांशी संवाद साधला.

उद्या होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी कोल्हापुरातील शाहू समाधी स्थळावर जाऊन उद्याच्या आंदोलनाची रुपरेषा स्पष्ट केली. यावेळी कार्यकर्त्यांना आवाहन देखील केलं आहे. आरक्षण देण्याची जबाबदारी सर्व आमदार, खासदारांची आहे. उद्याच्या आंदोलनाचं सर्व लोकप्रतनिधींना निमंत्रण दिलं आहे. लोकप्रतिनिधींचा आदर राखून आंदोलन करा, त्यांच्यासोबत वाद घालू नका, असं आवाहन संभाजीराजे यांनी केलं.

आंदोलनात सहभागी होणाऱ्यांनी कुणालाही उलटसूलट बोलू नये. आंदोलनात सहभागी होणाऱ्यांना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याचं आवाहन संभाजीराजे यांनी केलं. उद्या अतिशय शांततेमध्ये आंदोलन करायचं असून आंदोलनाची सुरुवात करण्याचा मान कोल्हापूरला असल्याचं देखील संभाजीराजे म्हणाले.

संभाजीराजे-उदयनराजे यांच्यात भेट

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज खासदार संभाजीराजे आणि खासदार उदयनराजे भोसले या दोन्ही राजेंची पुण्यात भेट झाली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांसमोर मराठा आरक्षणाबाबत आपापली भूमिका मांडली. “आमच्यात अनेक विषयांवर चर्चा झाली. मराठा आरक्षणावर आमच्यात एकमत आहे. कोल्हापूर आणि साताऱ्याचं घराणं एकत्र आलं याचा मला आनंद आहे. मराठा समाजाची दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही. राज्य सरकारने सहा मागण्या मान्य कराव्यात. अधिवेशनातून अनेक विषय मार्गी लागू शकतात,” असं संभाजीराजे म्हणाले.

 

First Published on: June 15, 2021 12:20 PM
Exit mobile version