मराठा आंदोलन; गोदावरी नदीत उडी मारणाऱ्या तरुणाचा मृत्यू

मराठा आंदोलन; गोदावरी नदीत उडी मारणाऱ्या तरुणाचा मृत्यू

काकासाहेब शिंदेचा मृत्यू

मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन सुरु असलेल्या आंदोलनाला राज्यभरामध्ये हिंसक वळण आले आहे. गेल्या पाच दिवसापासून आरक्षणाच्या मागणीवरुन हे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला आज आषाढी एकादशी दिवशीच गालबोट लागले आहे. औरंगाबादमध्ये एका आंदोलक तरुणाने गोदावरी नदीपात्रामध्ये उडी मारली. या तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर समाजाकडून उद्या (मंगळवारी) बंदाची घोषणा करण्यात आली आहे.

काकासाहेब शिंदेचा उपचारादरम्यान मृत्यू

औरंगाबादमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन आंदोलन सुरु होते. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक झालेल्या आंदोलकांनी जलसमाधी आंदोलन केले. दरम्यान अनेक तरुणांनी गोदावरी नदीमध्ये उड्या मारण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना पोलिसांनी अडवले. मात्र काकासाहेब शिंदे या तरुणाने संभाजीनगर मार्गावरील कायगाव येथे गोदावरी नदीपुलावरुन उडी मारली. या तरुणाला नदीपात्रातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र घाटी रुग्णालयात उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

आंदोलकांनी घटनास्थळी रास्तारोको केला

काकासाहेब शिंदे शिवसेनाचा कार्यकर्ता होता. त्याच्या मृत्यूनंतर आंदोलक आणखी आक्रमक झाले आहेत. त्यांनी घटनास्थळावर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत रास्तोरोको केला. औरंगाबाद- अहमदनगर रस्ता आंदोलकांनी रोखून धरला. त्यामुळे घटनास्थळावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यानंतर काही आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांवर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत गंगापूर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले.

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

संतप्त झालेल्या आंदोलकांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. जोपर्यंत मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत काकासाहेब शिंदे या तरुणाचा मृतदेह स्विकारणार नसल्याचे आंदोलकांनी सांगितले. यासंदर्भात औरंगाबादमध्ये मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांची बैठक देखील झाली. या बैठकीमध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

उद्या बंदाची हाक

राज्यातील मराठा संघटनांकडून मंगळवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. औरंगाबादमध्ये सोमवारी काढण्यात आलेल्या मराठा क्रांती मोर्चातील काकासाहेब शिंदे या तरूणा ने आंदोलनादरम्यान मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा संघटनांकडून हा निर्णय घेण्यात आला. मराठा संघटनांनी उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिल्याने परिस्थिती आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे.
First Published on: July 23, 2018 8:48 PM
Exit mobile version