मराठा आरक्षणासाठी अधिवेशन बोलवू, वेळ पडल्यास मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात पंतप्रधानांना भेटू – अजित पवार

मराठा आरक्षणासाठी अधिवेशन बोलवू, वेळ पडल्यास मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात पंतप्रधानांना भेटू – अजित पवार

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा दिलेला निकाल अत्यंत धक्कादायक आहे. पण मराठा समाजाला आरक्षण देण्यास आम्ही कटिबद्ध असून वेळ आल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीय शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. तसंच आवश्यकता भासल्यास पावसाळी अधिवेशनापूर्वी एक दिवसाचं अधिवेशन बोलवू, असं देखील अजित पवार म्हणाले. अजित पवार शुक्रवारी पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अजित पवार यांनी बैठक घेतली. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मराठा आरक्षणाच्या निर्णयावर बोलताना मराठा आरक्षणाचा दिलेला निकाल अत्यंत धक्कादायक असल्याचं म्हटलं. देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा आरक्षणासाठी वकिलांची जी फौज ठेवली होती. तीच फौज मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी ठेवण्यात आली होती. उलट अधिकचे वकील दिले होते. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय धक्कादायक आहे. मात्र, सरकार आरक्षण देण्यास कटीबद्ध आहे. जुलैमध्ये पावसाळी अधिवेशन होणार आहे. आवश्यकता पडल्यास मध्येच एक दिवसाचं अधिवेशन घेऊन एक ठराव करण्यात येईल. वेळ पडल्यास सर्व पक्षांना घेऊन मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधानांची भेट घेऊन मराठा आरक्षणाचा तिढा सोडवू, असं पवार म्हणाले.

लसीकरणावरुन केंद्रावर टीका

लसीकरणारवरून केंद्र सरकारच्या ढिसाळ कारभारावर अजित पवार यांनी टीका केली. रशियाने भारताला कोरोनाची लस दिली आहे. मात्र, त्यांच्या नागरिकांचं लसीकरण केल्यावरच त्यांनी भारताला लस पाठवली. आपण आपल्या देशातील नागरिकांचं लसीकरण पूर्ण न होताच इतर देशांना लसी पाठवल्या. हा अत्यंत चुकीचा निर्णय होता, अशी टीका अजित पवार यांनी केंद्र सरकारवर केली.

 

First Published on: May 7, 2021 3:12 PM
Exit mobile version