मराठी नाट्यसृष्टीतील ‘नाट्यदर्पणकार’ सुधीर दामलेंचे निधन

मराठी नाट्यसृष्टीतील ‘नाट्यदर्पणकार’ सुधीर दामलेंचे निधन

sudhir damle

पुणे : मराठी नाट्यसृष्टीमध्ये ‘नाट्यदर्पण पुरस्कार’ची संकल्पना रुजवणारे आणि ‘नाट्यदर्पण प्रतिष्ठान’चे संस्थापक सुधीर श्रीकृष्ण दामले यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी वयाच्या 82 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सुधीर दामले यांच्या पार्थिवावर काल म्हणजेच 8 जानेवारीला दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

गणेश सोळंकी यांच्या सल्ल्याने आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने 1975 मध्ये सुधीर दामले यांनी नाट्यदर्पण पुरस्कार सुरू केले. ते वितरित करण्यासाठी भव्य ‘नाट्यदर्पण रजनी’चे आयोजन ते करत होते. या पुरस्कार सोहळ्याच्या बरोबरीने ‘नाट्यदर्पण विशेषांक’ आणि ‘कल्पना एक-आविष्कार अनेक’ ही संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरही लोकप्रिय असलेली एकांकिका स्पर्धा हे उपक्रम नाट्यदर्पण प्रतिष्ठानतर्फे सुमारे 20 वर्षांपासून ते आयोजित करत होते.

मराठी नाट्यसृष्टीमध्ये या पुरस्काराचे आणि नाट्यदर्पण रजनीचे महत्त्व कायमच वादातीत होते. नाट्य, संगीत आणि चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार त्या प्रतिष्ठेच्या पुरस्कार सोहळ्याला आपुलकीनं उपस्थिती दर्शवत होते. हजारो नाट्यप्रेमी रसिकही ही रजनी वर्षांनुवर्षे ‘हाऊसफुल्ल’ करत होते. 25 वर्षे सातत्याने नाट्यदर्पण रजनीचे गारूड संपूर्ण नाट्यसृष्टीवर होते.

रसिकांच्या मनामध्ये हे प्रेम आणि औत्सुक्य शिखरावर आहे, अशा वेळीच निरोप घेणे योग्य या भावनेतून 25 वी नाट्यदर्पण रजनी झाल्यावर 1999 मध्ये दामले यांच्याकडून या उपक्रमाची सांगता करण्यात आली. विशेष म्हणजे हे सर्व उपक्रम बंद झाल्यानंतर गेली काही वर्षे त्यांचे वास्तव्य पुण्यात होते. येथेही सु-दर्शन रंगमंचाच्या विविध उपक्रमांना त्यांनी सक्रिय पाठिंबा दर्शविला होता.

First Published on: January 9, 2022 3:29 PM
Exit mobile version